पंढरीत हिंदू व मुस्लीम बांधवाकडून श्रीरामाची सामुदायिक आरती
पंढरपूर– अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचे औचित्य साधून येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अडीचशे वर्षापूर्वी स्थापन केलेल्या श्रीराम मंदिरामध्ये आज हिंदू मुस्लीम बांधवांच्या वतीने सामुदायिक आरती करण्यात आली. याव्दारे धार्मिक सलोख्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी आरती अशपाक सय्यद, इब्राहिम बोहरी, इक्बाल बागवान, समीर बेंद्रेकर, अकबर शेख, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, मनसे सरचिटणीस दिलीप धोत्रे, राजेंद्र महाराज मोरे, आदित्य फत्तेपूरकर, शाम गोगाव, चंद्रकांत दंडवते, गिरीष बोरखेडकर, माधव ताठे-देशमुख, विजय वाघ उपस्थित होते. यावेळी सर्व मुस्लीम बांधवांचा होळकर संस्थानच्या वतीने व्यवस्थापक फत्तेपूरकर यांनी सत्कार केला.
दरम्यान पंढरपूर शहर व तालुक्यात विविध गावात श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा मोठ्या उत्साहात आनंद साजरा करण्यात आला. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसरासह विविध चौकात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसेच भूमिपूजनानिमित्त फटाके फोडून श्रीरामाचा जयघोष करण्यात आला. अनेकांनी आपल्या घरावर व दुकानावर भगवे झेंडे लावले होते. श्री विठ्ठल मंदिर चार महिन्यापासून बंद असले तरी आज संत नामदेव पायरी येथील महाद्वार दरवाजा उघडून दिवे लावण्यात आले होते. विविध हिंदुत्वादी संघटनांनी श्रीराम मूर्तीची पूजा करून आपल्या घरासमोर रांगोळ्या काढल्या तर रात्री घरासमोर दिवेही लावण्यात आले होते.