सोमवारी पंढरपूर तालुक्यात रॅपिड अन्टीजेन चाचण्यात 107 जण पॉझिटिव्ह
पंढरपूर – गेल्या तीन दिवसांपासून पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट केल्या जात असल्याने कोरोनाबाधित रूग्णांची संख्या देखील वाढत आहे. सोमवार 10 ऑगस्ट रोजी प्रशासनाने शहरासह ग्रामीणमध्ये 650 चाचण्या घेतल्या असून यात 107 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
आज पंढरपूर शहरासह वाखरी, इसबावी, ओझेवाडी, एकलासपूर, करकंब तसेच उपजिल्हा रूग्णालय येथे चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
पंढरपूर शहर व तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही आता एक हजाराच्या पार गेली असून सोमवारी सकाळी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकार्यांच्या अहवालानुसार पंढरपूर तालुक्यात 1085 रूग्ण आढळून आले आहेत. यापैकी 458 जण उपचार घेवून घरी गेले आहेत तर 601 जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत येथे 26 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
सोमवारी सकाळच्या जिल्हा आरोग्य अधिकार्यांच्या अहवालात शहर व तालुक्यात 124 रूग्ण वाढले होते तर सायंकाळी आलेल्या रॅपिड अॅन्टीजेन टेस्टच्या अहवालात तालुक्यात आणखी 107रूग्ण वाढले आहेत. आज सकाळी इसबावी तसेच वाखरी परिसरात रॅपिड टेस्ट करण्यासाठी कॅम्प भरविण्यात आला होता. याची पाहणी प्रांताधिकारी सचिन ढोले तसेच मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व अन्य अधिकार्यांनी केली होती. येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रतिसाद दिल्याचे चित्र होते. शहरात आता तीन खासगी लॅब देखील कोरोनाच्या रॅपिड टेस्ट करत आहेत.