मंगळवारी  पंढरपूर तालुक्यात  रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये  81  रूग्ण वाढले

पंढरपूर, दि.11- शहर व तालुक्यात रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्याची मोहीम सुरू असून या अंतर्गत मंगळवार 11 ऑगस्ट रोजी 660 चाचण्या झाल्या असून यात एकूण 81 इतके रूग्ण आढळून आले आहेत. पंढरपूर शहरात 341 चाचण्या झाल्या असून 289 निगेटिव्ह तर 52 पाँझिटिव्ह असल्याचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी सांगितले. तर ग्रामीण भागात 29 रुग्ण आढळले आहेत.
गेल्या पाच दिवसांपासून पंढरपूर व परिसरात रॅपिड टेस्ट वाढविण्यात आल्या आहेत. जवळपास तीन हजार टेस्ट आजवर झाल्या आहेत. यामुळे रूग्ण संख्येत ही वाढ होत आहे. यासाठी बारा वैद्यकीय पथक शहर व तालुक्यात काम करत आहेत. आज शहरातील कर्नल भोसले चौकात शिबिर घेण्यात आले आहे. याच बरोबर ग्रामीण भागात विविध गावात रॅपिड टेस्ट घेतल्या जात आहेत. मंगळवारी सकाळच्या जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांच्या अहवालानुसार काल रात्रौपर्यंत पंढरपूर तालुक्यात 129 एकूण रूग्ण आढळले होते.यामुळे येथील एकूण आकडा 1214 इतका झाला आहे. यात आज रॅपिड चाचण्यात 81 रूग्णांची भर पडली आहे.
तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात घेण्यात येणार्‍या अ‍ॅन्टीजेन टेस्टमुळे रुग्ण संख्येत काहीशी वाढ होताना दिसत असली तरी रुग्ण सापडणे हे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी फायदेशीर आहे. कोरोना आजार उपचाराने बरा होणारा असल्याने या याबाबत कोणीही भीती बाळगू नये असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.
कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील लक्षणे नसणार्‍या व सौम्य लक्षणे असणार्‍या रुग्णांचे समुपदेशन करुन गृह अलगीकरण करण्यात येणार आहे. त्यांना दिलेल्या आरोग्य विषयक सूचनांचे पालन करण्यासाठी शहरी भागात वार्डस्तरीय समिती व ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समिती यांच्या मार्फत लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे ढोले यांनी सांगितले.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!