पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ नामविस्तार सोहळा संपन्न
सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाज व देशासाठी आयुष्यभर लढून समाज सुधारण्याचे महान कार्य केले आहे. अशा या रणरागिणी अहिल्यादेवी होळकर यांच्या देशप्रेम, लढवय्या, एकसंघवृत्तीचा विचार नव्या पिढीसमोर आणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने देशात एक आदर्श निर्माण करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
बुधवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ नामविस्तार सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानावरून सहकारमंत्री देशमुख हे बोलत होते. याप्रसंगी राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचारमंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार नारायण पाटील, महापौर शोभा बनशेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, शेळी व मेंढी महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे राजाभाऊ सरवदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, राज्य बँकेचे संचालक अविनाश महागावकर, समता गावडे, गोपीचंद पडळकर, नगरसेवक चेतन नरोटे, माजीमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, माजी महापौर अरुणा वाकसे, बाळासाहेब शेळके, विजयकुमार हत्तुरे, उत्तम जानकर, प्रा. महेश माने, मोहन डांगरे यांच्यासह समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रारंभी कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याचा विस्तृत आढावा घेतला. अहिल्यादेवी या कुशल प्रशासक होत्या. त्याकाळी राजसत्ता सांभाळून एक आदर्शवत कार्य अहिल्यादेवींचे होते, असे सांगून आता विद्यापीठातून त्यांच्या विचारांचा ठसा निश्चितच उमटेल असा विश्वास कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मुख्य प्रवेशद्वाराजवळ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ फलक व कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. प्र-कुलगुरू डॉ. एस. आय. पाटील यांनी स्वागत केले.
सहकारमंत्री देशमुख म्हणाले, एक आनंदाचा सोहळा आज होत असून या माध्यमातून अहिल्यादेवी यांच्या विचारांचा गौरव होत आहे. काल मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा ठराव मांडला. हा ठराव एकमताने मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री व राज्यपाल महोदयांनी अध्यादेश काढला. थोर महापुरुषांच्या नावाने नव्या पिढीला एक प्रेरणा मिळत असते. आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातून वैभवशाली राष्ट्रासाठी चांगले कार्य व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
जलसंधारणमंत्री प्रा. शिंदे म्हणाले, सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी यांचे नाव देण्याची अनेक वर्षापासूनची मागणी होती. यासाठी सर्वप्रथम अरुणा वाकसे या महापौर असताना ठराव झाला. तेव्हापासून अधिकृतरित्या त्याकरिता लढा सुरू झाला. आज देवेंद्र फडणवीस सरकारने वेळेत नाव देण्याचे कार्य केले आहे. अहिल्यादेवींनी आपले राज्य सांभाळताना आदर्शवत कार्य केले आहे. आता यापुढे विद्यापीठातून त्यांचा इतिहास निश्चितच समोर येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पशुसंवर्धनमंत्री जानकर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐतिहासिक निर्णय घेत दिलेला शब्द पाळला आहे. त्यामुळे समस्त धनगर समाज बांधवांकडून मुख्यमंत्र्याचे जाहीर अभिनंदन करीत असून आता या विद्यापीठाकरिता विशेष निधी देण्यासाठी आपला प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.
खासदार डॉ. महात्मे म्हणाले सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिल्याने त्यांचे कार्य आता अजरामर राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्रिमंडळातील आणि सर्व वरिष्ठ मंत्र्यांनी चांगला निर्णय घेऊन धनगर समाजाला न्याय दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, मान्यवर, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत कोकरे यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी मानले.