पंढरपूरमध्ये कोविड-19 वॉर रुम’ कार्यान्वित
पंढरपूर, दि. 20 :- कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आवश्यक माहिती तसेच कोरोनाबाधित रुग्णांना आरोग्य विषयक सुविधेची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी प्रांत कार्यालय पंढरपूर येथील सांस्कृतिक भवन येथे ‘कोविड-19 वॉर रुम’ कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रसार पाहता. या परस्थितीवर नियत्रंण ठेवण्यासाठी कोविड केअर, सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल,येथील कामकाजाचे संनियंत्रण करण्यामध्ये कोविड-19 वॉर रुम महत्वाची भूमिका बजावणार आहे.त्यामध्ये रुग्णालयातील उपलब्ध बेड, आय.सी.यु बेड, दाखल रुग्णांची संख्या, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या, डिसचार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या, महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील उपचार, स्वच्छता आदी बाबत माहिती घेण्यात येत असल्याचे प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.
तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या कोरोना अजारा बाबत समस्या तात्काळ सोडविण्यासाठी तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या आरोग्य सुविधेची माहिती उपलब्ध होण्यासाठी कोविड-19 वॉर रुमची स्थापना केली आहे. ही वॉर रुम 24 ×7 कालावधीसाठी सुरु असून, कोरोना आजाराबाबत सुविधा व समस्याबाबत 02186-222020 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे, आवाहन तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी केले आहे.