जिल्हा प्रशासनाशी नाही तर केवळ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, मंदिर प्रवेश आंदोलनावर संघटना ठाम
पंढरपूर- कोरोनामुळे बंद असणा श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करावे या मागणीसाठी 31 ऑगस्ट रोजी वारकरी संघटनांनी वंचित बहुजन विकास आघाडीचे संस्थापक ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या मंदिर प्रवेश आंदोलनाबाबत जिल्हा प्रशासनाने सोमवार (24 ऑगस्ट) रोजी बोलाविलेल्या बैठकीस आम्ही उपस्थित राहणार नाहीत. कारण मंदिर उघडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनातील अधिकारी घेवू शकत नाहीत. याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेवू शकत असल्याने त्यांनी याबाबत चर्चा करावी अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे, विश्व वारकरी संघटनेचे अरूण महाराज बुरघाटे , तुकाराम महाराज चवरे तसेच अखिल भारतीय वारकरी मंडळाचे सुधाकर महाराज इंगळे यांनी घेतली आहे.
याबाबत पंढरपूर विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. याबाबत बोलताना आनंद चंदनशिवे म्हणाले, मंदिर दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्रीच घेवू शकतात. जिल्हा प्रशासनाने आज सोलापूरमध्ये आम्हाला बोलाविले असले तरी येथील अधिकाऱ्यांना मंदिर दर्शनासाठी खुले करण्याचा अधिकार नाही. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यासाठी चर्चेला बोलवावे तसेच मंदिर दर्शनासाठी खुले करावे. जर मंदिर उघडले नाही तर 31 ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक लाख भाविक पंढरीत जमतील व आंदोलन करणार आहेत. आम्ही त्या दिवशी मंदिरात प्रवेश करू. यासाठी आमची तयारी पूर्ण झाली असून गावोगावी हजारो पत्रक ही वितरित करण्यात आली आहेत.
याबाबत बोलताना विश्व वारकरी सेनेचे अरूण महाराज बुरघाटे म्हणाले, वारकऱ्यांनी शासनाला कोरोनाच्या लॉकडाऊन काळात खूप मदत केली आहे. सर्व सण, उत्सव तसेच वारी घरीच साजरी केली. आता मॉल व अन्य सर्व काही खुले होत असतान मंदिरच केवळ बंद ठेवली जात आहेत. यामुळे वारकरी संभ्रमात आहेत. यावेळी जर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी कधीच मंदिर खुली करण्यास सांगितले असते. मात्र आता आमच्या मदतीला ॲड. बाळासाहेब आंबेडकर धावून आले आहेत. आमच्यापासून त्यांना कोणताही राजकीय लाभ नाही मात्र तरीही ते केवळ भाविकांच्या मागणीसाठी या आंदोलनात उतरले असल्याचे बुरघाटे महाराज यांनी सांगितले.
सुधाकर महाराज इंगळे यांनी स्पष्ट केले की, वारकऱ्यांनी संमयाने नाथषष्ठीपासून आत्तापर्यंत घरीच राहणे पसंत केले आहे. सर्व उत्सव व वारी घरीच साजरी केली आहे. मात्र आता अनलॉक सुरू झाल्यानंतर राज्यातील मंदिर खुली झाली पाहिजेत. आरोग्य विषयक सर्व नियम पाळून भाविक मंदिरात येतील. मध्यंतरी आषाढीनंतर पंढरपूरमध्ये महाद्वार काला झाला यात संत नामदेव महाराजांचे वंशज तसेच हरिदास महाराज यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले तसेच अन्यत्र भजन कीर्तन करणाऱ्यांवर ही कारवाईचा बडगा उचलण्यात आला. शासनाने हे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत अशी मागणी त्यांनी केली. कोरोनाच्या काळात मानसिक स्वास्थ्य टिकावे यासाठी कीर्तन व भजनाची गरज असल्याचे ते म्हणाले.