पंढरपूरमध्ये कोरोना सबजेलपर्यंत पोहोचला, चार बंदी पॉझिटिव्ह
पंढरपूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक कोरोनाचा संसर्ग हा पंढरपूर शहर व तालुक्यात झाला आहे. येथे 2370 रूग्ण आजवर आढळून आले आहेत. याचा फैलाव वाढत असताना कोरोना येथील सबजेलपर्यंत पोहोचला असून येथे असणार्या चार बंद्यांना याची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
येथील सबजेलमध्ये विविध गुन्ह्यातील पन्नास बंदी आहेत. यापैकी पाच जणांना सर्दी, ताप असा त्रास जाणवू लागल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. यात चारजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर एकाचा अहवाल हा निगेटिव्ह आहे. चार पॉझिटिव्ह अहवाल असलेल्या बंद्यांना आता उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित 45 जणांची कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे.
दरम्यान शुक्रवारी 28 ऑगस्ट रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 42 व तालुक्यात 16 असे 58 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत. येथील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 370 झाली आहे. आज कोरोनामुळे 1 जण मरण पावले आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावल्यांची एकूण संख्या 47 आहे. सध्या एकूण 671 रूग्णांवर उपचार सुरू असून तर 1616 जण कोरोना मधून बरे झाले आहेत.