माढ्यात भाजपाकडून लढण्यास संजयमामांचा नकार !
माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी नकार दिल्याचे खात्रीलायक वृत्त असून त्यांनी करमाळा विधानसभाच जिंकण्याचा आपला मनोदय असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर स्पष्ट केल्याचे समजते.
शरद पवार यांनी माढ्यातून न लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर येथून भाजपाच्या वतीने कोण लढणार ? याकडे सार्यांचे लक्ष होते. मंगळवारी सकाळी माजी खासदार व राष्ट्रवादीचे युवा नेते रणजितसिंह मोहिते पाटील भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली होती. मोहिते पाटील भाजपाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यानंतर सायंकाळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांना मुंबईत बोलाविण्यात आले होते. शिंदे हे जिल्ह्यातील भाजप प्रणित महाआघाडीचे नेते असून त्यांचे मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटण्यापूर्वी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी त्यांनी चर्चा केली व रात्रौ उशिरा देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक झाली. यात शिंदे यांनी आपण लोकसभा लढवू इच्छित नसल्याचे सांगितल्याचे कळते.
शिंदे यांना करमाळा विधानसभा मतदारसंघातच रस असून यासाठी त्यांनी जोरदार तयारी केली आहे. मागील विधानसभेला त्यांना येथून पराभूत व्हावे लागले होते. दरम्यान या बैठकीत बरीच चर्चा झाली असल्याचे समजते.