पंढरपूर-बार्शीत रुग्ण संख्या 3 हजार पार; माळशिरस, माढा व करमाळ्यात कोरोना प्रादुर्भाव वाढयेय
पंढरपूर – कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशात व राज्यात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन होता, यानंतर हळूहळू यात शिथिलता देण्यात आली आहे. आता तर व्यवहार सुरळीत होत असले तरी कोरोनाचा फैलाव कमी झालेला नाही. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तर या अनलॉक काळात हा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. पंढरपूर व बार्शी या तालुक्यांमधील रूग्ण संख्या तीन हजारांच्या वर आहे.
याच बरोबर ग्रामीण भागात माळशिरस ,माढा, करमाळा येथे ही कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने या तालुक्यांनी हजाराचा आकडा पार केला. माळशिरस तालुक्यात 2 हजाराहून अधिक कोरोनाबाधित आहेत. दरम्यान अर्थकारण व संसर्गावर नियंत्रण ठेवण्याची कसरत करावी लागत आहे. प्रशासन वैद्यकीय सेवा पुरविण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे. शासकीय व खासगी दवाखान्यांमध्ये कोरोनाचे रूग्ण रोजच वाढत आहेत.
सुरूवातीला सोलापूर शहर व आजुबाजूच्या तालुक्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत होता मात्र आता अक्कलकोट, दक्षिण व उत्तर सोलापूरसह मोहोळ भागात याचे रूग्ण कमी होताना दिसत आहेत. मात्र उर्वरित जिल्ह्यात संसर्गाचा आलेख वाढता आहे. तीर्थक्षेत्र पंढरपूर व तालुका हे ग्रामीणमध्ये कोरोनाच्या रूग्णसंख्येत आघाडीवर आहेत. 3342 रूग्ण संख्या या तालुक्याची आहे. बार्शी भागात ही कोरोनाचे थैमान असून काल एकाच दिवसात 199 रूग्ण संख्या वाढल्याने तेथील एकूण आकडा हा 3032 झाला आहे.
माळशिरस तालुक्याने कोरोनाबाधितांचा आकड्यात दोन हजाराचा टप्पा गुरूवारी पार केला आहे. 2023 रूग्ण संख्या तेथे आहे. अकलूज व आजुबाजूच्या गावात कोरोनाचा वाढता फैलाव पाहता जनता कर्फ्यूची अंमलबजावणी होत आहे. प्रशासन मार्च महिन्यापासून कोरोनाच्या लढार्इत अविरतपणे काम करत असून आता जनतेने ही त्यांना साथ देणे गरजेचे बनले आहे. स्वयंशिस्तीशिवाय आता पर्याय राहिलेला नाही.
तालुका तालुक्यात कोविड केअर सेंटर , हॉस्पिटल तयार केली जात आहेत. खासगी रूग्णालयात बेड राखून ठेवले जात आहेत. सौम्य लक्षण असणाऱ्या घरीच विलगीकरणाची सोय असल्यास त्यांना घरातच राहून उपचाराची सोय आहे. प्रशासन सर्वतोपरी उपचारांच्या सोयी करून देत असले तरी हा आकडा आता कमी होणे आवश्यक बनले आहे. वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. कोविड 19 च्या लढार्इतील अनेक कोरोना योध्द्यांना ही याचा संसर्ग झाला आहे. याचा विचार करून आता नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून मास्क, सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे आवश्यक आहे. विनाकारण फिरण्यावर ही बंधन आणणे आवश्यक बनले आहे.
कोरोनाचा संसर्ग अगोदर सोलापूर शहर नंतर ग्रामीण भागातील निम शहर व आता गावोगावी पसरत चालला आहे. सांगोला तालुक्यात 879 रूग्ण आजवर सापडले आहेत तर मंगळवेढ्यात हा आकडा 668 इतका आहे. मोहोळ 707, अक्कलकोट 752, उत्तर सोलापूर 567 तर दक्षिण सोलापूरमध्ये 1105 रूग्ण आजवर सपडले आहेत.