ग्रामीण भागात तंत्रज्ञानाची गंगा पोहोचविण्यासाठी भगीरथ प्रयत्न करणाऱ्या डॉ.प्रशांत पवार यांचा देशपातळीवर गौरव
पंढरपूर– एन.के.एन.च्या माध्यमातून आय.सी.टी. एनेबल्ड स्कूल एज्युकेशन इन रुरल एरिया हा ग्रामीण भागात तंत्रज्ञान रूजविण्याचा प्रयोग करणाऱ्या स्वेरीचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार यांनी 20 किलोमीटर परिघातील पाच शाळा वाय-फायच्या माध्यमातून जोडून प्राथमिक व माध्यमिक स्तरातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला. यासह ग्रामीण क्षेत्रात विविध उपक्रम राबविल्याबद्दल त्यांना भारत सरकारच्या एआयसीटीई अर्थात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून दिला जाणारा ‘विश्वेश्वरय्या बेस्ट टीचर अवॉर्ड’ केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते व एआयसीटीईचे चेअरमन डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत तसेच देशभरातील अकरा हजार संस्थांमधील लाखो शिक्षकांच्या ऑनलाइन उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
देशभरातील 11 हजार संस्थामधील लाखो शिक्षकांमधून केवळ 12 शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. तंत्रशिक्षण व संशोधन क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या डॉ. प्रशांत पवार यांनी महाराष्ट्राच्या तंत्रशिक्षणाचा आणि तंत्रशिक्षकाचा झेंडा देश पातळीवर मोठ्या डौलाने फडकावण्याचा मान मिळवला आणि त्यामुळे त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ.प्रशांत पवार यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पंढरपूर तालुक्यातील खर्डी मधून झाले. उच्च माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी सोलापूर गाठले. बारावी विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण करून त्यांनी ‘सिव्हील इंजिनिअरींग’ मधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे ते आसाममधील आयआयटी ‘गुवाहाटी’ मधून एम. टेक.ची पदवी घेऊन बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी भारतातील प्रथम क्रमांकाची विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था आय.आय.एस.सी. बंगळूर येथून पी.एच.डी. सुवर्णपदकासह पूर्ण केली. दरम्यान त्यांनी अमेरिकेतील इटोन कंपनीत काही काळ काम पाहिले. पुढे पोस्ट-डॉक्टरल रिसर्च साठी ते दक्षिण कोरियातील सेऊल येथील कोन्कुक विद्यापीठात गेले. त्यानंतर 2008 साली त्यांनी स्वेरी मध्ये दाखल होऊन संशोधन विभाग सांभाळला. त्यांच्या 11 प्रकल्पांमधून विविध आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय संस्थांकडून सुमारे चार कोटी रुपये इतका संशोधन निधी प्राप्त झाला. तो मिळालेला निधी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास व संशोधन यांसाठी वापरला जात आहे.
पुढे डॉ. बी.पी.रोंगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली भाभा अणुसंशोधन केंद्राच्या समन्वयातून डॉ. प्रशांत पवार यांनी ‘रुरल ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फॅसिलिटी’ ही सुविधा विकसित केली. हे करत असताना त्यांनी त्यांचे संशोधन सुरूच ठेवले. अमेरिका, दक्षिण कोरिया, कॅनडा, फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड, चीन, दुबई आदी देशांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. त्यांची चार पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत तर तीन पेटंटस त्यांच्या नावे आहेत. एकूणच संशोधन संस्कृतीचा भक्कम पाया स्वेरीत उभा करण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. एक संशोधक असण्याबरोबरच ते हाडाचे उपक्रमशील शिक्षक देखील आहे. विद्यार्थी अभियंत्यांना उच्च शिक्षणासाठी उद्युक्त करताना ‘गेट’ परीक्षेबाबत ते विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन करीत असतात. विद्यार्थ्यांमधील कुतूहल संशोधनापर्यंत नेण्यासाठी ते विशेष परिश्रम घेतात. स्थानिक पातळीवर शेतीशी निगडित संशोधनाला चालना देण्यासाठी ‘ऍग्रो चॅलेंज’ या स्पर्धेचे यशस्वी आयोजन ते सातत्याने करीत आलेले आहेत. शिकण्याची गती कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासंबंधी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे आणि समुपदेशनाचे उत्तम परिणाम मिळालेले आहे. सोबत संशोधनातून ‘पर्यावरण व ग्रामविकास’ ही संकल्पना राबवताना त्यांनी ‘ग्रीन टीम’ ची निर्मिती केली आहे. या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 700 विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून तीन हजार वृक्षांची लागवड व जोपासना केली आहे.
ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न व समस्या समजून घेण्याच्या उद्देशाने ‘ग्राम विजिट’ ‘उन्नत भारत’ व ‘उन्नत महाराष्ट्र अभियान’ देखील त्यांनी राबवले. समाजासाठी होणाऱ्या संशोधनाच्या सुफल चर्चेसाठी त्यांनी ‘टेक्नो-सोसायटल 2016 व 2018 या आंतरराष्ट्रीय परिषदांचे यशस्वी आयोजन केले. ज्यांचे उदघाटन भारतातील ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ.अनिल काकोडकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. कोटा हरीनारायण यांच्यासारख्या विभुतींकडून झाले आहे. ग्रामीण जनतेला तंत्रज्ञान सोपे करून उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने त्यांनी आषाढी वारी दरम्यान विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचे प्रदर्शन व प्रात्यक्षिक घडवून आणले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रक्षेत्राची ओळख निर्माण करून देण्यासाठी डॉ. पवार यांनी ‘किमया अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची’ या उपक्रमाचा अवलंब केला. आपल्या विद्यार्थ्यांसोबत जलसंवर्धनासंबंधी ते बऱ्याच ग्रामस्थांना आणि ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करतात. विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक अडचणींना सोडवण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. तीनशेच्या वर शाळांचे त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. तसेच स्थानिक अभियंते, डिप्लोमा विद्यार्थी व कारागीर यांच्यासाठी मार्गदर्शन सत्राचे आयोजन डॉ. पवार यांनी केले आहे. संशोधन आधिष्ठाता या पदा सोबत त्यांची प्राध्यापक पदाची कारकीर्द ही उल्लेखनीय आहे. त्यांचा सहाय्यक प्राध्यापक ते अधिष्ठाता हा कार्यप्रवास भारावून टाकणारा आहे. हेड ऑफ सिव्हील इंजीनिअरिंग, डिपार्टमेंट, इन्स्टिट्यूट ॲक्रीडीएशन कोऑर्डिनेटर, डीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट, मेंबर सेक्रेटरी, इंटेल्लेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स अकॅडमी अशी विविध पदे ते भूषवित आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, कोलकत्ता इंडियाच्या राज्य कार्यकारणीवर एरोनॉटिक्स विभाग सदस्य म्हणून कार्यरत आहेत तर ‘हेलिकॉप्टर फोरम’ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिनिधिक संस्थेवर ते भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. या पदावर कार्य करताना आपल्या कल्पकतेतून त्यांनी विविध उपक्रमांचा अवलंब केला आणि त्यातून सर्वार्थाने सर्वोत्तम परिणाम मिळवून देण्यावर भर दिला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबतच जगभरच्या अनेक विद्यार्थी संशोधकांशी त्यांनी संवाद ठेवला आहे. अनेक शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे यांच्याकडून संशोधन चर्चासत्रात त्यांना विशेष मार्गदर्शनासाठी निमंत्रित केले गेले आहे. पाच विद्यार्थी संशोधकांनी डॉ.प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पूर्ण केली आहे तर अनेक विद्यार्थ्यांना एक उद्योजक म्हणून स्वयंपूर्ण करण्यासाठी डॉ.पवार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. यापूर्वी त्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील गुणवंत शिक्षक या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
राष्ट्रीय पातळीवरील ‘विश्वेश्वरय्या बेस्ट टीचर अवार्ड’ प्रथम क्रमांकाने मिळवल्याबद्दल डॉ.प्रशांत पवार यांचा स्वेरीचे विद्यमान अध्यक्ष एन.एस.कागदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराबद्दल मनोगत व्यक्त करताना डॉ.पवार यांनी आपला शैक्षणिक व संशोधनातील प्रवास उलगडत आपल्या यशाचे श्रेय स्वेरीला दिले. यावेळी संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, स्वेरीचे संस्थापक विश्वस्त दादासाहेब रोंगे, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी.रोंगे, संस्थेचे माजी अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त सूरज रोंगे, डॉ.स्नेहा रोंगे, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.