कारखान्याबरोबरच पांडुरंग परिवाराची जबाबदारीही आता आमदार प्रशांत परिचारक यांच्या खांद्यावर
पंढरपूर– ज्येष्ठ नेते सहकारतपस्वी कै. सुधाकरपंत परिचारक यांनी मोठ्या कष्टाने व जिद्दीने साकारलेल्या व राज्यात सहकारक्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद त्यांच्या पश्चात आता त्यांचे पुतणे आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. संचालक मंडळाने याबाबत निर्णय घेतला. दरम्यान आता प्रशांत परिचारक यांच्याकडे पांडुरंग परिवाराचे कुटुंबप्रमुख म्हणूनही संपूर्ण जबाबदारी आली आहे.
आमदार प्रशांत परिचारक हे गेले अनेक वर्षे कै. पंतांच्या बरोबर काम करत होते.यामुळे त्यांना कारखानदारी बरोबर वित्तीय संस्था चालविण्याचा मोठा अनुभव आहे. सहकार, समाजकारण , राजकारण यासह कृषीक्षेत्रातील पंतांचे काम त्यांनी जवळून पाहिले आहे. ते या सर्वच क्षेत्रात काम करत असून सध्या दि पंढरपूर अर्बन को-ऑप बँकेचे ते अध्यक्षही आहेत. त्यांनी मागील काही वर्षात या बँकेचे कार्यक्षेत्र राज्याच्या विविध भागात विस्तारले आहे. त्यांनी बँक फेडशनवर जिल्हा व राज्य पातळीवर काम पाहिले आहे. यासह आता जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालकही आहेत.
श्रीपूरचा पांडुरंग सहकारी साखर कारखाना हा खासगी साखर उद्योग कै. पंतांनी 1990 च्या काळात विकत घेवून तो सहकारी म्हणजे शेतकऱ्यांच्या मालकीचा केला. या कारखान्याचे विस्तारीकरण याच बरोबर आसवनी व सहवीज निर्मिती प्रकल्प साकारून या कारखान्यास राज्यातील एक अग्रेसर साखर उद्योग अशी ओळख दिली. आज सोलापूर जिल्ह्यात अनेक कारखाने अडचणीत असताना पांडुरंगची घौडदौड कायम राहिली. शेतकऱ्यांना सर्वाधिक व वेळेत ऊसदर देणारा हा कारखाना आहे. सर्वात जास्त पुरस्कार या कारखान्याने मिळविले आहेत. कै.पंतांनी या कारखान्याचे नाव पांडुरंग ठेवले होते. याच नावावरून परिचारक गटाला पांडुरंग परिवार असे नाव मिळाले आहे. या अध्यक्षपद कै. सुधाकरपंत परिचारक यांच्याकडे होते. त्यांच्या निधनानंतर आता संचालक मंडळाची बैठक होवून कारखान्याची जबाबदारी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे देण्याचा निर्णय झाला.
आमदार परिचारक यांनी ज्या संस्था सांभाळल्या आहेत व त्यांची नेहमीच प्रगती झाली आहे. कै. पंतांप्रमाणेच त्यांचे काम हे काटकसरीचे असल्याचे आजवर दिसून आले आहे. पंतांनी अनेक वर्षापूर्वी त्यांच्याकडे अर्बन बँकेसह बाजार समितीचा कारभार सोपविला होता. या संस्था आज प्रगतिपथावर आहेत. आमदार परिचारक हेच आता जिल्ह्यातील सहकारा संस्थांवर काम पाहात आहेत तसेच पंढरपूर नगरपरिषद असो की पंचायत समिती..यावर ही त्यांचे वर्चस्व आहे.
कै. सुधाकरपंत परिचारक हे अखेरच्या श्वासापर्यंत सहकार, राजकारणात सक्रिय राहिले होते. ते पांडुरंग परिवाराचे कुटुंबप्रमुख म्हणून काम पाहात होते. मात्र आता त्यांच्या निधनानंतर ही जबाबदारी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे आली आहे. पंतांप्रमाणेच ते संस्थांचा कारभार करत असल्याने त्यांच्यावर सभासद व शेतकऱ्यांचा विश्वास आहे. परिचारक गटाचे राजकीय नेतृत्व यापूर्वीच आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे आले आहे.