पंढरपूर– मागील एक महिन्यापासून पंढरपूर शहर व तालुक्यात वाढत असणाऱ्या कोरोना रूग्णांची संख्या पाहता चिंता व्यक्त केली जात होती. मात्र आता दिलासादायक चित्र दिसू लागले असून येथील एकूण रूग्ण संख्या 4593 इतकी झाली असली तरी कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा 3805आहे. रूग्ण ब होण्याचे प्रमाण 82.84 टक्के झाले आहे. काल शुक्रवारच्या अहवालानुसार 1060 रूग्ण उपचार घेत होते तर आज शनिवारी 26 सप्टेंबरच्या रिपोर्टप्रमाणे ही संख्या 676 असल्याने मागील दोन दिवसात 384 रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
आज जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 707 जण कोरोनामुक्त झाले असल्याचे दिसत आहे. यात सर्वाधिक संख्या ही पंढरपूर शहर व तालुक्याची 384 इतकी आहे. पंढरपूरचा कोरोना रिकव्हरी दर वाढत आहे. शहर व तालुक्यात 112 जणांनी आपले प्राण कोरोना आजारात गमावले आहेत. येथील मृत्यूदर हा 2.43 टक्के इतका आहे. शुक्रवारच्या अहवालानुसार पंढरपूर शहर व तालुक्यात 1060 रूग्ण उपचार घेत होते मात्र शनिवारच्या अहवालात हा आकडा 676 इतका कमी झाला आहे. 384 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
पंढरपूर शहर व तालुक्यात 4593 कोविड रूग्ण आढळून आले होते. यापैकी 3805 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 112 जण मृत आहेत. सध्या 676 जण उपचार घेत आहेत. यात शहरात एकूण 2265 रूग्ण आढळून आले होते यापैकी 1984 जणांनी कोरोनावर मात केली असून शहराचा रिकव्हरी दर 87.59 टक्के आहे तर ग्रामीण भागात 2328 रूग्ण सापडले आहेत यापैकी 1821 जण बरे झाले आहेत. ग्रामीणचा रिकव्हरी दर 78.22 टक्के आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण भागाचा विचार केला तर सरासरी रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 71 टक्के आहे.
पंढरपूरमध्ये प्रशासनाच्या वतीने कोविड रूग्णांच्या सोयीसाठी केअर सेंटर उभी करण्यात आली आहेत याच बरोबर लक्षण नसलेल्यांना घरीच उपचाराची सोय करण्यात आली आहे. येथील उपजिल्हा रूग्णालयासह खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड रूग्णांवर उपचाराची सोय असून कालच येथील जनकल्याण हॉस्पिटलमध्ये तीस ऑक्सिजन बेडची सोय करण्यात आली आहे. नगरपरिषदेने नदीच्या पैलतिरावर भक्तिसागर येथे कोविड केअर सेंटर उभारले आहे.