कमला एकादशीः मंदिर बंद, तरी पंढरीत भाविकांची हजेरी; चंद्रभागा स्नान ,नामदेव पायरी व कळसाचे दर्शन
पंढरपूर- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच धार्मिक स्थळ बंद आहेत. पंढरपूरचे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर ही 17 मार्चपासून भाविकांच्या दर्शनासाठी बंदच ठेवण्यात आले आहे. अशा स्थितीत रविवारी 27 मार्च रोजी अधिक महिन्यातील कमला एकादशीचे औचित्य साधून शेकडो भाविकांनी पंढरपूरला येवून चंद्रभागा नदीत स्नान, संत नामदेव पायरी व श्री विठ्ठल- रूक्मिणी मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले.
दरम्यान रविवारी भाविकांची संख्या पंढरीत वाढल्याने जवळपास सहा महिन्यानंतर मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांची धावपळ दिसून आली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अगोदर लॉकडाऊन असल्याने साच बंद होते. मात्र नंतर हळूहळू अनलॉक सुरू झाला. मात्र धार्मिक स्थळ बंदच राहिली आहेत. पंढरपूरमधील अन्य व्यवहार सुरळीत होत असताना मंदिर परिसरातील दुकाने मात्र भाविकांअभावी बंद होती.
रविवारी 27 सप्टेंबर रोजी कमला एकादशीचा योग होता. दर तीन वर्षांनी येणारा अधिक महिना सध्या सुरू असून यातील या एकादशीला खूप महत्व आहे. एरव्ही अधिक महिन्यात पंढरपूरला भाविकांची तोबा गर्दी असायची मात्र यंदा कोरोनामुळे मंदिरच बंद आहे. अशा स्थितीत ही शेकडो भाविक पंढरपूरला आले होते. त्यांनी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करून भक्त पुंडलिक, संत नामदेव पायरीसह श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले व विठुरायाच्या नगरीचा निरोप घेतला.
दरम्यान पंढरपूरचे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर हे भाविकांच्या दर्शनासाठी बंद असले तरी नित्योपचार सुरूच परंपप्रमाणे सुरूच आहेत. रविवारी कमला एकादशीनिमित्त विठ्ठल व रूक्मिणी मंदिर ऑर्चिड, कार्नेशन, गुलाब, जरबेरा, तगर,मोगरा, कामिनी, तुळशी,झेंडू, आष्टर, शेवंती अशा बारा प्रकारच्या फुलांनी सजविण्यात आले होते. तसेच श्री विठ्ठल सभामंडपात श्रींची प्रतिमा असलेली रांगोळी साकारण्यात आली होती. ही सजावट पुण्याचे भक्त राम जांभूळकर यांच्या वतीने करण्यात आली होती.
दरम्यान पंढरीत रविवारी एकादशी दिवशी झालेली गर्दी पाहता प्रशासनाच्या वतीने शहरातील प्रमुख रस्त्यांवर तसेच प्रदक्षिणा मार्गावर व अन्यत्र फवारणी करण्यात आली आहे. दुकानदारांनी आरोग्यविषयक काळजी घेवून व्यापार करावा, मास्क-सोशल डिस्टन्सिंग तसेच सॅनिटायझरचा वापर करावा तसेच मठांच्या विश्वस्तांनी ही काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.
मंदिर परिसरात फवारणी केली जात होती