कृषिराज शुगरच्या दुसऱ्या गाळप हंगामाचा शुभारंभ, 1 लाख टन ऊस गाळपाचे उदिष्ट
पंढरपूर – भोसे (तालुका पंढरपूर) येथील कृषिराज शुगरच्या दुसऱ्या गाळप हंगामाचा शुभारंभ शुक्रवारी झाला असून यंदाच्या हंगामात 1 लाख टन ऊस गाळपाचे उदिष्ट असल्याची माहिती कार्यकारी संचालक ॲड. गणेश पाटील यांनी दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै.राजूबापू पाटील, महेश पाटील आणि अनंतराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यंदा कृषिराज साखर कारखान्याने 1 लाख टन ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजूबापू पाटील यांच्यावर मोठा विश्वास होता, त्या विश्वासाला तडा न जाऊ देता चालू गाळप हंगामात कारखान्याला गाळपासाठी येणाऱ्या उसाला इतर कारखान्याप्रमाणे दर देणार असल्याचे प्रतिपादन कृषिराज शुगर कारखान्याचे कार्यकारी संचालक ॲड.गणेश पाटील यांनी केले.
यावेळी ह. भ.प. जयवंत महाराज बोधले, भोसे विकास सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, माजी उपसरपंच शेखर (भैय्या) पाटील, सहकार शिरोमणीचे संचालक दिनकर कदम, जि.प. सदस्य अतुल खरात, शहाजीराव पाटील, यशवंतभाऊ पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष जयवंत गावंधरे, सरपंच आदिनाथ देशमुख, माउली कोरके, महादेव पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना ह.भ.प. जयवंत महाराज बोधले महाराज म्हणाले की, राजूबापू पाटील यांनी शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन कारखान्याची उभारणी केली. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून राजकरण केले, तिच परंपरा गणेश पाटील आणि पाटील परिवार अखंडित ठेवतील.
राजूबापू पाटील यांची स्वप्नपूर्ती करणाऱ्या कृषिराज शुगरचा या दुसराच गाळप हंगाम असून यंदा प्रथमच बापूंच्या अनुपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. बापूंसह पाटील कुटुंबातील 3 सदस्यांच्या अकाली जाण्याने या कार्यक्रमावर ही शोककळा दिसून आली.
यावेळी आदिनाथ देशमुख, अतुल खरात यांनी मनोगत व्यक्त केले, तर प्रस्ताविक शहाजीराव पाटील यांनी केले.
कार्यक्रमास मारुती कोरके, दिलीप कोरके, चांगदेव जमदाडे, सुनील तळेकर, धैर्यशील पाटील, आशिष पाटील, नागनाथ भांडे, अविनाश पाटील, सुधीर व्यवहारे,कालिदास साळुंखे,बंडू पवार उपस्थित होते.