सहकार शिरोमणी बंद राहिल्यास हजारो कुटुंब अडचणीत येतील , सामंजस्याने तोडगा काढण्याची कामगारांची मागणी
पंढरपूर , दि.05 – सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे कामगार संघटनेचा कारखान्याच्या संचालक मंडळावर आमचा पूर्ण विश्वास असून थकीत देणी देण्यासाठी संस्था कटिबध्द आहेत. शेतकरी संघटनांनी राजकारण करण्यापेक्षा कारखान्याचे चेअरमन व प्रशासन यांनी एकत्रित बसून तोडगा काढावा अन्यथा कारखान्यावर अवलंबुन असणारे हजारो कुटुंब, सभासद, तोडणी -वाहतूक कंत्राटदार यांच्या चुली बंद पडतील असे निवेदन कामगारांच्या वतीने प्रांताधिकारी सचिन ढोले व तहसीलदार वैशाली वाघमारे यांना देण्यात आले.
यावेळी दिलीप काळे ,बंडू पवार, बाबासाहेब पिसे, माउली कुंभार ,प्रवीण लिमकर, पांडूरंग बोंगे-उपस्थित होते.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना कामगार संघटना (इंटक) अध्यक्ष व सर्व कारखाना कामगार यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यात नमूद करण्यात आले आहे की, सन 1998-1999 मध्ये स्व.वसंतराव (दादा) काळे यांनी भाळवणीच्या माळरानावर चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती करुन प्रथम चाचणी गळीत हंगाम सुरु केला. सन 1998 ते 2016-17 पर्यंत कारखान्याचे कामगारांना कारखाना व्यवस्थापनाने वेळेवरती पगार, पगारवाढ, बोनस,महागाई भत्ता व जादा कामाचा भत्ता इत्यादी सर्व सुख सोयी दिलेल्या आहेत.
कल्याणराव काळे यांनी दि.24/07/2000 पासून कारखान्याचे चेअरमनपदाची धुरा आजतागायत चांगल्या प्रकारे सांभाळली असून त्यांनी सर्व कामगारांच्या सुख सोयीसाठी ना नफा ना तोटा या धर्तीवर चंद्रभागा बझारची स्थापना करुन जीवनावश्यक वस्तूंच्या सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. तसेच कामगार सेवकांची पतसंस्था निर्मिती करुन कारखान्याच्या कामगारांना कमी व्याज दराने कर्ज पुरवठा केलेला आहे. आमचे कारखान्यातील मयत झालेल्या कर्मचाज्यांना सर्व कर्मचार्यांच्या वतीने अर्ध्या दिवसाची पगार रक्कम आर्थिक मदत म्हणून मयत कर्मचार्यांच्या कुटुंबास अदा करीत आहोत.
हंगाम 2017-18 पासून सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे कारखाना पुर्ण क्षमतेने न चालल्याने कारखान्याचे डिस्टिलरी व कोजनसारखे प्रकल्प उत्पादन करु शकले नाहीत. तसेच हंगाम 2019-20 उसाअभावी कारखाना बंद ठेवावा लागला. त्यामुळे कारखाना आर्थिक अडचणीत असल्यामुळे आम्हाला पगार व इतर सुविध मिळणेस विलंब झालेला आहे. यामध्ये चेअरमन व कारखाना व्यवस्थापन यांचा काहीही दोष नाही. कारखाना बंद काळात काही कर्मचारी बंधू इतर चालू असणार्या कारखान्यावर कामावर गेले होते. त्या ठिकाणच्याही पगारी अद्याप मिळालेल्या नाहीत.
तरी या वर्षी चेअरमन व संचालक मंडळ हंगाम 2020-21 करीता कारखाना सुरु करण्यासाठी निधी उपलब्ध करणेसाठी प्रयत्नशिल आहेत. त्याहेतून कामगारांनी मशिनरी दुरुस्ती देखभालीची कामे पूर्ण केलेली आहेत. कारखान्याचे सभासद,कामगार,व वाहन मालक यांच्या दृष्टीने हंगाम 2020-21 मध्ये कारखाना सुरु होणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच कामगारांची देणी देण्यास कारखाना व्यवस्थापन कटिबध्द असताना काही राजकीय संघटनानी कारखाना कामगारांना भडकविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आम्हा कामगारांना कारखाना व्यवस्थापनावर पूर्ण विश्वास असून कामगार पगारीबाबतीत इतर संघटनांनी हस्तक्षेप करु नये. आमची सर्व कर्मचाऱ्यांची एकजूट असून कारखाना उभारणी काळापासून आजपर्यंत कुठल्याही प्रकारे संप / आंदोलन आम्ही केलेले नाही.
सध्या काही संघटना कार्यकर्त्यांनी आमच्या कारखान्याचे सभासद, तोडणी वाहतूक कंत्राटदार व कामगार यांचे देय रक्कमेबाबत जे आंदोलन चालू केले आहे यामुळे कारखान्याची बदनामी होवून कारखान्यासाठी कर्ज पुरवठा करणार्या बँकांकडून अर्थ सहाय्य होण्यास अडचणी निर्माण होतील. कारखाना निधी अभावी बंद राहिल्यास कारखान्यावर अवलंबून असणारे सभासद, तोडणी वाहतुकदार, कामगार व इतर घटक अशा हजारोंच्या कुटुंबाच्या चुली बंद पडतील व त्याचा कारखान्यावर कायमस्वरुपी विपरित परिणाम होणार आहे. तरी संघटना कार्यकर्त्यानी व आंदोलकांनी वरील बाबींचा विचार करुन,आपण आंदोलन मागे घेवून आम्हा कामगारास सहकार्य केल्यास कारखान्यास बँकांकडून कर्ज पुरवठा होवून 2020-21 सुरु करण्यासाठी मदत होणार आहे.
सर्व कामगारांच्यावतीने केलेल्या निवेदनाचा विचार करुन संबंधित संघटना कार्यकर्त्यांना आंदोलन मागे घेण्यास प्रवृत्त करावे असे निवेदन प्रांताधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले.