कौतुकास्पद : अवघ्या 20 दिवसात सातारा येथे सुसज्ज कोविड हॉस्पिटलची उभारणी
सातारा – अवघ्या 20 दिवसात अतिशय चांगल्या सुविधा असलेले कोविड हॉस्पिटल उभं करण हे सातारा जिल्हा प्रशासनाचे कौतुकास्पद काम आहे. जगभरातील अन्य देशात लाट ओसरली ओसरली म्हणता म्हणता दुसरी कोरोना प्रादुर्भावाची लाट आल्याचे उदाहरण असल्यामुळे आपल्याला अधिक सजग राहून काम करावं लागेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. माझं कुटुंबं माझी जबाबदारी ही मोहीम आपण लोकांना या प्रादुर्भावा पासून दूर ठेवण्यासाठी राबवत असल्याचेही त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानी उभं असलेल्या संग्रहालयाचं रूपांतर कोविड हॉस्पिटल मध्ये करून त्यांच्या विचारांनाच अभिप्रेत असलेले कार्य आपण करत आहोत हे निश्चितच अभिमानास्पद आहे. या ठिकाणी उत्तम सुविधा आहेत. त्याचा वापर करून कोविड बाधितांना उत्तम आरोग्य देण्यासाठी प्रयत्नात राहा. इथून पुढे लस कधी का येईना आपण कोविड प्रादुर्भाव रोखणाऱ्या मास्क, हातधुणे आणि अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर करून आपल्याला या प्रादुर्भावापासून दूर ठेवू या असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आवाहन केले. सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात उभारलेल्या कोविड हॉस्पिटलच्या ऑनलाईन उदघाट्न प्रसंगी शुक्रवार ९ आँक्टोंबर रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ऑनलाईन पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आरोग्यमंत्री राजेश टोपे ( ऑनलाईन ), सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, खा. श्रीनिवास पाटील,आ. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आ.जयकुमार गोरे, आ. मकरंद पाटील, आ. दिपक चव्हाण, आ. महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, कोविड हॉस्पिटल उभारणीत मदत करणाऱ्या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.