खासगी हॉस्पिटलच्या बिलांवर लक्ष ठेवा : अजितदादांची प्रशासनाला सूचना
सातारा – लोकप्रतिनिधी, प्रशासन हे कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अविरत प्रयत्न करीत आहेत. या काळात खासगी हॉस्पिटलच्या एक लाख ₹ पुढच्या बिलाचे ऑडिट करावे, त्यावर लक्ष ठेवून राहा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या.
ते सातारा येथे उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाच्या प्रारंभप्रसंगी बोलत होते. ते म्हणाले, , छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानी उभं असलेल्या संग्रहालयात रयतेच्या आरोग्य सेवेसाठी काम होणार आहे. खरं तर इथे कोणाला यायची वेळच येऊ नये अशा सदिच्छा देतो, जिल्ह्यात एक सुसज्ज कोविड हॉस्पिटल असावं अशी सर्वांचीच इच्छा होती त्या इच्छेची पूर्ती होत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. यावेळी जंबो कोविड हॉस्पिटल उभं केल्यानंतर जबाबदारीही तेवढीच मोठी असल्याची जाणीव जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला त्यांनी यावेळी करून दिली. पुणे विभागाला कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करायच्या उपाययोजनेसाठी 151 कोटी दिले असून पाच जिल्ह्यापैकी सातारा जिल्ह्याला 45.59 कोटी रुपये दिल्याची घोषणाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केली.
या रूग्णालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी ९ आँक्टोंबर रोजी ऑनलाईन झाले. यावेळी पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आरोग्यमंत्री राजेश टोपे ( ऑनलाईन ), सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, खा. श्रीनिवास पाटील,आ. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आ.जयकुमार गोरे, आ. मकरंद पाटील, आ. दिपक चव्हाण, आ. महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, कोविड हॉस्पिटल उभारणीत मदत करणाऱ्या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.