आबा-पंत पुन्हा होणे नाही मात्र त्यांच्या विचारांचा वारसा तरी आपण जपू शकतो ना?
अग्रलेख
घरामध्ये जुनी जाणती असतील तर अनेकदा ते बाका प्रसंग उभा ठाकला की यातून नेमका मार्ग शोधून देतात. म्हणूनच लोक थोरा-मोठ्यांच्या आशीर्वादासाठी झुकतात. ज्या घरात जाणती माणसं असतात ती कुटूंब ही मोठी व संस्कारित झालेली आपण पाहतो. हाच निकष राजकारण, समाजकारण व राजकीय पक्षांनाही असतो. जेथे जास्त अनुभवी मंडळी असतात ते आपआपल्या परीने कठिण प्रसंगात मार्ग शोधतात. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारण, सहकार व समाजकारणात गेली पन्नास वर्षांहून अधिकचा काळ स्व. भाई गणपतराव देशमुख यांनी अशाच मार्गदर्शकाच्या भूमिकेत घालविला. त्यांना 1970 च्या दशकापासून पंढरपूरचे स्व. सुधाकरपंत परिचारक हे साथ देत होते. वास्तविक पाहता गणपतआबा हे वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ होते. तत्वनिष्ठ राजकारणाचे चालते बोलते विद्यापीठ असणार्या भाई गणपतराव देशमुख यांनी सोलापूर जिल्ह्याला खूप काही दिले. ते जन्मले मोहोळ तालुक्यातीलय पेनूरला मात्र कर्मभूमी होती ती दुष्काळी सांगोला. त्यांनीच केवळ आपल्या मतदारसंघाचा विचार केला नाही तर आजुबाजूच्या माण, खटाव, आटपाडी यासारख्या भागाला ही त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. क्रांतीवीर नागनाथआण्णा नाईकवाडी, डॉ. भारत पाटणकर यांना बरोबर घेवून त्यांनी दुष्काळी भागाला हक्काचे पाणी देण्यासाठी आयुष्य वेचले. केवळ याच भागात भाई देशमुख यांचे काम सिमीत नव्हते तर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा असेल की पंढरपूर अथवा अन्य तालुक्यांच्या प्रश्नावर ही आवाज उठविला. राजकीय पक्ष न पाहता जो आमदार प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न करतो त्याच्या पाठीशी आबा निश्चित उभे असत. मंगळवेढ्याच्या पाणीप्रश्नी पंढरपूरचे तत्कालीन आमदार कै. भारत भालके यांनी विधीमंडळात पोटतिडकीने प्रश्न मांडले होते यास भाई गणपतराव देशमुख यांनी केवळ समर्थनच दिले नाही तर त्यांच्या बाजूने उभे राहात दुष्काळाच्या व्यथाही शासनाच्या कानावर घातल्या. त्यांनी विकासात कधीच राजकारण आणले नाही. कै. भाई गणपतराव देशमुख , स्व.सुधाकरपंत परिचारक हे जिल्ह्याचे पितामह म्हणून ओळखले जात. अनेक वर्षे दोघांनी एकत्र काम केले मात्र पक्षाची विचारसरणी कधीही आडवी येवू दिली नाही. जिल्ह्याच्या सहकारावर याच दोघांनी नियंत्रण ठेवले होते. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे जिल्ह्याचे नेते म्हणून पुढे आल्यावर त्यांना सहकार व समाजकारणात साथ ही आबा व पंतांनी केली. जोवर भाई देशमुख व पंत परिचारक हे येथील सहकारात सक्रिय होते तोवर बरेच काही आलबेल होते मात्र नंतर विनानियंत्रण वाहनाची जी अवस्था होते तशी अनेक संस्थांची झाली. तत्वाचे राजकारण जवळपास या जिल्ह्यातून आपण संपलेले पाहतो.
भाई गणपतराव देशमुख यांनी आपला विचार कधीच सोडला नाही. त्यांनी राजकीय धडे शेतकारी कामगार पक्षातून शिकून घेतले व त्याच पक्षाचे काम अंतिम श्वासापर्यंत केले. जिल्ह्याच्या जडणघडणीत ज्यांनी मोलाचे काम केल्या त्या सर्वच दिग्गजांसमवेत आबांनी केले. यात सर्व पक्षांचे नेते होते. यात कै. तुळशीदास जाधव, कै. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, नामदेवराव जगताप, कै. आप्पासाहेब काडादी, बाबूराव चाकोते, ब्रह्मदेवदादा माने, स्व. सुधाकरपंत परिचारक अशा अनेक मातब्बरांचा समावेश आहे. 1950 च्या दशकातील पिढीपासून ते 2021 मधील नव्या दमाच्या नेत्यांसमवेत त्यांनी काम केले. मात्र कधीही त्यांनी आपल्या विचारसरणीचा विसर पडू दिला नाही. कायम ते शेतकरी, कामगार, वंचित, शोषितांच्या पाठीशी राहिले. सर्वसामान्यांचा विकास व्हावा म्हणून ते जिल्ह्याच्या सहकारात उतरले व त्यांनी आपले योगदानही दिले.