श्री विठ्ठल रखुमाई चरणी तब्बल कोटभर रूपयांचे गुप्तदान
पंढरपूर- पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या चरणी एका भक्ताने एक कोटी रूपयांचे दान दिले असून हे गुप्त ठेवण्याची विनंती या कुटुंबाने मंदिरे समितीकडे केली आहे.
ही एक कोटी रूपयांची देणगी मुंबई भागात राहणार्या एका भाविक कुटुंबाने दिली आहे. याची माहिती अशी की, अलीकडेच कोरोनामुळे एका श्री विठ्ठल भक्ताचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबाला विमा कंपनीकडून काही जे पैसे मिळाले आहेत ते त्यांनी श्री विठ्ठलाच्या दानपेटीत अर्पण केले. इतकी मोठी रक्कम दान देऊन ही भाविक कुटुंबाने आपले नाव मात्र गुप्त ठेवण्याची विनंती मंदिर समितीला केली असून त्यानुसार त्यांचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.
विठ्ठल मंदिराला सतत देणग्या मिळत असतात. अलिकडे तर कोरोनाकाळात ऑनलाइन देणग्या देणार्यांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे मंदिर समितीला विनंती करून काही वृध्द भाविक घरी बोलावून लाखाच्या देणग्या देत आहेत. अशा भाविकांच्या सोयीसाठी मंदिर समितीचे कर्मचारी त्यांच्या घरी जावून त्यांचा सत्कार करून विठ्ठल चरणी त्यांनी दिलेली देणगी स्वीकारत आहे. यापूर्वी मोठ मोठ्या देणग्या मिळाल्या असल्या तरी कोटभर रूपयांची देणगी मिळण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी.