पंढरपूर पोटनिवडणूक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काटेकोरपणे नियोजन करण्याच्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

पंढरपूर, दि. 28 – पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक मुक्त, निर्भय आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांनी निवडणूक आयोगाच्या आणि कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्देशाप्रमाणे काटेकोरपणे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक तयारीबाबत प्रांताधिकारी कार्यालय, पंढरपूर येथे आढावा घेण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुशिल बेल्हेकर, स्वप्निल रावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, निशिकांत प्रचंडराव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम, नायब तहसीलदार मनोज श्रोत्री, सुधाकर धाईंजे, एस.पी.तिटकारे उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर निवडणूक कोरोनाच्या कालावधीत होत असल्याने नियुक्त अधिकारी कर्मचारी तसेच मतदार यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने मतदान केंद्रावर आवश्यकत्या उपाययोजना कराव्यात. मतदान केंद्राची पाहणी करुन आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. निवडणूक कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच निवडणूक नियुक्ता सर्व अधिकारी आणि विभागांनी नेमून दिलेले काम समन्वायने व काटेकोरपणे करावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी दिल्या. तसेच मतदारांची जागृती करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांचा अवलंब करावा, विविध माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी बैठकीत विधानसभा मतदासंघातील एकूण मतदार, मतदार केंद्रे, एक खिडकी योजना, भरारी पथक, सी व्हिजील ॲप, ऐंशी वर्षावरील जेष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार संख्या व त्यानुसार करावयाचे नियोजन, कोरोना बाबत घ्यावयाची काळजी , निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक मनुष्यबळ, मतदान अधिकारी कर्मचारी यांना देण्यात येणारे प्रशिक्षण याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. विधानसभा पोट निवडणूकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजनेची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी यावेळी दिली.

बैठकीनंतर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी निवडणूक नियंत्रण कक्ष, शासकीय गोडाऊन येथील स्ट्रॉग रुम, निवडणूक साहित्य ठेवण्यात येणाऱ्या जागेची पाहणी करुन आवश्यकत्या सूचना दिल्या.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!