सोलापूर विद्यापीठात आता अभियांत्रिकीबरोबरच ऑनर्सची डिग्री घेता येणार
सोलापूर, दि. 17– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संलग्नित सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयातून आता विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणासोबतच ऑनर्सची डिग्री देखील घेता येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून ही संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक तत्वानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल करिअरसाठी ही संधी उपलब्ध करून दिली आहे. अभियांत्रिकीच्या सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांना ऑनर्स डिग्री घेता येणार आहे.
अभियांत्रिकीचा नियमित अभ्यासक्रम पूर्ण करताना अधिकची ही ऑनर्स डिग्री विद्यार्थ्यांना मिळणार आहे. जेणेकरून याचा विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. इंडस्ट्रीच्या मागणीनुसार अशी संधी उपलब्ध करून दिली जात आहे. विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार डिग्री घेऊन करियर करता येणार आहे. यासाठी विद्यापीठाकडून सध्या अभ्यासक्रम आणि आराखडा तयार केला जात असल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांनी सांगितले. ऑनर्स डिग्रीचा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना चांगला फायदा होईल, असा विश्वास अभियांत्रिकी विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी व्यक्त केला आहे.