अकलूजमध्ये 150 डॉक्टरांच्या सहकार्यातून कोविड हॉस्पिटलची उभारणी, शनिवारी प्रारंभ
अकलूज- माळशिरस तालुक्यातील 150 डॉक्टरांच्या सहकार्यातून अकलूज येथे 100 बेडचे सुसज्ज कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले असून याची सुरूवात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत उद्या 15 ऑगस्ट रोजी होणार आहे. या रूग्णालयासाठी डॉक्टरांनी जवळपास 1 कोटी 60 लाख रूपये खर्च केला आहे.
या दवाखान्यासाठी जिल्हाधिकार्यांकडून 1 हजार पीपीई किट व 5 हजार ग्लोव्हज देण्यात आले आहेत. शासनाने आम्हास अखंडित ऑक्सिजन पुरवठा करावा अशी मागणी यावेळी डॉ. नितीन एकतपुरे यांनी केली.या हॉस्पिटलसाठी आवश्यक असणारा नर्सिंग स्टाफ एनजीओ नर्सिंग ब्युरो व शिवरत्न शिक्षण संस्था पुरवणार आहे. तर ग्रामपंचायत अकलूज सफाई कामगार देणार आहेत. येथे काम करणार्या डॉक्टर व नर्सिंग स्टाफचा शासन 50 लाख रूपयांचा विमा उतरणार आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता माळशिरस तालुक्यात इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा संघटनेशी संबंधित अॅलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक क्षेत्रातील सुमारे 150 डॉक्टरांनी स्वयंत्स्फूर्तीने अकलूज कोविड हॉस्पिटलची कल्पना मांडली होती. याच्या उभारणीसाठी जिल्हाधिकार्यांकडून अकलूज येथील प्रशस्त असा एमटीडीसी हॉल देण्यात आला आहे.
येथे 20 बेड व्हेंटिलेटर व 80 बेड ऑक्सिजन सुविधा असणारे बनविण्यात आले आहेत. हे हॉस्पिटल शासनाच्या नियमानुसार व दर प्रणालीनुसार चालविण्यात येणार आहे. तालुक्यातील डॉ.एम.के.इनामदार, विवेक गुजर, समीर बंडगर, अतुल फडे, समीर दोशी, श्रीकांत हेगडे, सुनील नरूटे, सचिन सावंत, भूषण चंकेश्वरा, गायकवाड, श्रीकांत देवडीकर या 15 फिजिशियन डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली इतर प्रत्येकी 10 डॉक्टर अशी पंधरा पथक 24 तास हे हॉस्पिटल चालवणार आहेत.
उद्या उद्घाटन प्रसंगी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राम सातपुते, नितीन करीर, धेर्यशील मोहिते-पाटील, सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, पं. स. सभापती शोभा साठे, पं. स. उपसभापती अर्जुनसिंह मोहिते -पाटील, प्रांताधिकारी शमा पवार, तहसीलदार अभिजित पाटील, डॉ. रामचंद्र मोहिते उपस्थित राहणार आहेत.