उजनीचा यंदा वजा 22 ते उपयुक्त पातळीत 111 टक्क्यायपर्यंत प्रवास, संथगतीने मात्र आश्‍वासक


पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारे उजनी धरण यंदाचा पावसाळा संपताना आता 111.28 टक्के उपयुक्त पातळीत भरले असून यातून अद्यापही भीमा नदीत पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरूच आहे. या प्रकल्पाने यावर्षी वजा 22 ते उपयुक्त पातळीत क्षमतेने भरण्याचा प्रवास केला असून तो अत्यंत संथगतीने झाला आहे.
यंदा कमी पावसामुळे उजनी धरण ऑक्टोंबर महिन्यात क्षमतेने भरले आहे. यानंतर यातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आजही भीमा नदीत अडीच हजार क्युसेकचा विसर्ग सुरूच आहे तर दौंडची आवक ही साडेचार हजार क्युसेकच्या आसपास आहे. उजनीतून कालव्यात 1400 तर सीना माढा 148, दहिगाव 63 तर सीना-भीमा बोगद्यात 150 क्युसेकने पाणी सोडले जात आहे.
उजनी पावसाळ्याच्या सुरूवातीला जून महिन्यात वजा 22 टक्के अशा स्थितीत होते. यंदा जून व जुलै मध्ये चांगला पाऊस झाला मात्र नंतर पर्जन्यराजाने भीमा खोरे व उजनी जलाशयावर विश्रांती घेतल्याने हा महाकाय प्रकल्प उशिरा भरला. भीमा खोर्‍यातील उजनीला पाणी देवू शकणारी धरणं अगोदरच भरली होती मात्र नंतर पावसाने दडी मारल्याने यातून पाणी पुढे येवू शकले नाही. खडकवासला प्रकल्पाने यंदा उजनीला साथ दिली. तेथूनच जास्त पाणी सोडले गेले होते.
दरम्यान सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात व ऑक्टोंबर महिन्यात उजनी जलायशकाठी तसेच घोड उपखोर्‍यातील पावसाने चांगली साथ केली व हे धरण शंभरच नव्हे तर एकशे दहा टक्के भरले व यातून पाणी सोडावे लागले. या महिन्यात उजनीतून सर्वाधिक विसर्ग 40 हजार क्युसेक इतका सोडावा लागला आहे. ज्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहात होती.
उजनीवर गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. 18 ऑक्टोंबरपर्यंत या प्रकल्पावर 539 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद आहे. मागील वर्षी एक हजार मि.मी. पाऊस झाला होता. या धरणात सध्या 123.28 टीएमसी एकूण पाणीसाठा असून यातील उपयुक्त पाणी हे 59.62 टीएमसी इतके आहे. धरण ऑक्टोंबर महिन्यात क्षमतेने भरलेले आहे व यातून भीमेत पाणी सोडले जात असल्याने नदीकाठच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे. तसेच उपलब्ध पाण्यात पुढील पावसाळ्यापर्यंत नियोजन योग्य पध्दतीने होवू शकते.
उजनी धरण क्षमतेने भरल्याने आता लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण असून रब्बी व उन्हाळा हंगामात शेतीला मुबलक पाणी मिळू शकते. यासह विविध उपसा योजनांची ही सोय झाली आहे. जलाशयकाठी ही शेतकरी आनंदी आहे. याच बरोबर औद्योगिक व पिण्याच्या पाण्याच्या योजनांची सोय झाली आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!