अकलूज पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, गोव्यात जावून लावला त्या बाळाच्या पालकांचा शोध

संतोष भोसले

अकलूज – मडगाव (गोवा) येथून पळवून आणलेल्या बाळाचे आई-वडील शोधून देण्यात अखेर अकलूज पोलिसांना यश आले असून बाळ सापडल्याचे दूरध्वनीवरून समजल्यावर त्या मातेचे अश्रू अनावर झाले होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेळगाव (ता. इंदापूर) येथील हणमंत बाबूराव डोंबाळे (वय 65 वर्षे )हा एक फिरस्ता इसम असून गत 16 वर्षांपासून आपल्या कुटूंबाचा त्याग करून ते या गावातून त्या गावात फिरतात. असेच फिरत असताना ते गोव्यातील मडगाव येथे पोहोचले. मागून खायचं आणि फूटपाथवर झोपायच असा त्यांचा दिनक्रम.
अशाच एका फूटपाथवर राहणार्‍या आनंद क्षेत्री आणि पूजा क्षेत्री यांच्याशी त्यांची ओळख झाली. आनंद हा परराज्यातील. गोव्यात काम शोधत आलेला. मिळेल तिथे काम करणारा. पूजा त्याची बायको ही हॉटेलमध्ये भांडी घासून चार पैसे कमवणारी स्त्री. रात्रीच्यावेळी हे दांपत्य मडगावमध्ये फूटपाथवरच झोपायचे. हणुमंत यांनी त्यांच्याशी ओळख निर्माण केली. काही दिवस ते तेथेच राहिले. एके दिवशी त्यांच्या दीड वर्षाच्या बाळाला चॉकलेट देतो म्हणून सोबत घेतले आणि पसार झाले.
क्षेत्री दांपत्याने दिवसभर या बाळाची शोधाशोध केली. पण त्यांचे बाळ काही मिळून आले नाही. परिस्थिती गरीबीची आणि ते परराज्यातील असल्यामुळे त्यांनी घाबरून पोलिसत तक्रार ही दिली नाही. हणुमंत डोंबाळे यांनी त्या बाळाला सोबत घेतले. माझी बायको वारली आहे आणि मीच या बाळाचा सांभाळ करतो आहे असे म्हणत त्यांनी अनेक ठिकाणाहून पैसे घेतले आणि अकलूज गाठले.
रविवार दि. 9 ऑगस्ट रोजी मध्यरात्री अकलूज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला असलेल्या गाळ्यांच्या शेडमध्ये हनुमंत आढळून आले. या इसमाचा संशय आल्यामुळे चेतन इश्‍वर सोलंके यांनी पोलिसांना त्यांच्या विषयी खबर दिली. पोलिसांनी हणुमंत यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. हे बाळ माझेच आहे. पत्नीचे भांडण झाल्यामुळे मी घर सोडून आलो आहे असे सांगितले. पोलिसांनी त्याच्या घरी फोन लावला असता हा इसम गत 16 वर्षांपासून घरीच आला नसल्यसाचे कळले. तसेच त्याची मुले 18 वर्षांची आहेत असे पोलिसांना समजले. यानंतर पोलिसी खाक्या दाखविल्यावर हनुमंत यांनी आपण हे बाळ गोवाच्या मडगावमधून आणल्याचे कबूल केले.
यानंतर अकलूज पोलिसांनी गोवा येथील पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर (मडगाव पोलीस) यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडे बाळ हरवल्याची कोणतीही तक्रार आली नव्हती. शेवटी पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल राजू नायकवडी व पोलीस शिपाई संदेश रोकडे हे हनुमंत यांना घेऊन मडगांव येथे गेले. तेथे त्याने बाळ कोठून उचलले ती जागा दाखवली. त्याच ठिकाणी क्षेत्री दांपत्यही आढळून आले. या दोघांना ही त्यांच्या बाळाविषयी माहिती दिल्यानंतर त्या मातेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
कोरोनाचा काळात अकलूज पोलिसांनी मडगाव येथे जावून हनुमंत याच्याकडून माहिती घेत या बाळाच्या आईवडिलांना शोधून काढले. दरम्यान त्या बाळाला अकलूज पोलिसांनी पंढरपूरच्या अनाथालयात दाखल केले आहे. त्याच्या पालकांना आता मडगाव येथू शोधून त्यांना याची रितसर माहिती देण्यात आली आहे. आता पुढील दोन तीन दिवसात सर्व कायदेशीर प्रकिया पूर्ण करून या बाळाला आईवडिलांच्या ताब्यात दिले जाईल.
या घटनेत बाळाच्या अपहरणाची कोणतीही तक्रार नव्हती, अशा वेळी परराज्यात जावून पालकांचा शोध घेणे खूप क्लिष्ट होते. मात्र अकलूज पोलिसांनी ही कामगिरी चोखपणे बजावली आहे ,त्यांचे कौतुक होत आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!