अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना


पंढरपूर.दि.24-अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करुन अहवाल सादर करावेत अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील गार्डी, कासेगांव, सांगोला तालुक्यातील महूद येथील कासाळ-गंगा ओढा तसेच माळशिरस तालुक्यातील मळोली येथील अतिवृष्टिने पूर आल्यामुळे नुकसानग्रस्त पिकांची व पडझड झालेल्या घरांची पहाणीभरणे यांनी गुरूवारी (24 सप्टेंबर) केली.

यावेळी आमदार भारत भालके, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, उदयसिंह भोसले, शमा पवार, तहसिलदार वैशाली वाघमारे, योगेश खरमाटे, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, संतोष राऊत, स्मिता पाटील, तालुका कृषि अधिकारी गजानन ननवरे ,दिपाली जाधव, राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, महावितरणचे अभियंता कासार उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टिने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच घरांची पडझड झाली आहे. पंढरपूर, माळशिरस व सांगोला तालुक्यातील 54 गावांतील मोठ्या प्रामाणात पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सुमारे 6500 ते 7000 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त 517 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. याम बंधाऱ्यांचे व पाझर तलावांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पुराच्या पाण्यामुळे काही गावातील विद्युत पुरवठा खंडीत झाला असल्याने तो पुर्वरत करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

अतिवृष्टिने शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थित शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, शासनस्तरावरुन आवश्‍यक ती सर्व मदत करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार भारत भालके यांनी नुकसानगस्त शेतकऱ्यांना व नागरिकांना शासनाच्या वतीने तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली. पंढरपूर तालुक्यात अतिवृष्टिमुळे विविध ठिकाणी नुकसान झालेल्या भागांची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पालकमंत्री भरणे यांना दिली.

1,166 thoughts on “अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना