आमच ठरलंय..काय…भांडत भांडत एकत्र यायचे ?

प्रशांत आराध्ये

पंढरपूर –  विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, यंदा पावसाने ही उशिरा का होईना चांगली हजेरी लावल्याने दिलासादायक चित्र आहे, दिवाळीची धामधूम सुरू आहे..पण राज्याला एक प्रश्‍न पडलाय आता बहुमत मिळविलेल्या महायुतीतील महत्वाच्या दोन घटक पक्षात म्हणजे भाजपा व आणि शिवसेनेत नक्की  ठरलंय काय?..भांडत भांडत एकत्र यायचे की आणखी काय..?निवडणुकीचे निकाल लागताच शिवसेना व भाजपामध्ये पुन्हा ताणाताणी सुरू आहे, मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी जागा वाटपाचा फॉर्म्युला माध्यम विचारत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून दोन्ही पक्षांचे नेते उत्तर द्यायचे. आमच ठरलंय..बस्स. यामुळे विरोधी पक्ष आणि मतदार काय ठरलंय..? याचा विचार करून दमले. निवडणुकीपूर्वी हे दोन्ही पक्ष किती जागा लढविणार हे अगदी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जाहीर झाले. तोपर्यंत अर्ज भरणारे आणि त्यांचे समर्थक ही बुचकळ्यात पडले होते. भाजपा आणि शिवसेनेत दोन्ही काँगे्रसमधील अनेकांनी प्रवेश केल्याने तिकिट वाटपानंतर बंडखोरी होणार हे निश्‍चित मानले जात होते आणि झाले ही तसेच.महायुती होवून निवडूक लढली गेली यामुळे आता निकालानंतर ही दोन्ही पक्ष एकत्रित येत लवकर निर्णय जाहीर करतील अशी शक्यता गृहित धरली गेली पण आता जनतेने कौलच असा दिला आहे की शिवसेना ही निर्णायक ठरली आहे. या पक्षाला घेतल्याशिवाय भाजपाला आणि दोन्ही काँगे्रसच्या आघाडीला सत्ताच स्थापन करता येत नाही. 2014 एकमेकांविरोधात लढलेले भाजपा व शिवसेना नंतर एकत्र आले. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाला सत्तास्थापनेसाठी बिनशर्त पाठिंबा देवून धमाल उडवून दिली होती व नंतर शिवसेना भाजपा बरोबर गेली.आता ही मतमोजणी होताच शिवसेनेने सत्तेत पन्नास टक्के वाटा मागितला आहे..अगदी मुख्यमंत्रिपद ही त्यांना अडीच वर्षे हवे आहे. तत्पूर्वी दोन्ही काँगे्रसकडून शिवसेनेला बरोबर घेवून सत्ता स्थापण्याची काही विधानं झाली आणि नवीन समीकरण जुळणार का? असा प्रश्‍न जनतेच्या मनात निर्माण झाला. मग निवडणुकीपूर्वी नक्की भाजपा व शिवसेनेत काय ठरलंय..? याची चर्चा रंगू लागली आहे. एका बाजूला मुख्यमंत्री फडणवीस छातीठोकपणे सांगतात महायुतीचेच सरकार येणार..आणि दुसरीकडे जोवर सत्तेत पन्नास टक्के वाट्याची लेखी हमी मिळत नाही तोवर शिवसेना निर्णय घेणार नाही अशी भूमिका या पक्षाने मांडल्याने आता दिवाळीनंतर दुसर्‍या शक्यतांचा काही मोठा धमाका होणार की आत्ताच्या या चर्चा नंतर लवंगी फटाकडी सारख्या वाजून घराच्या अंगणापुरताच आवाज मर्यादित राहणार ?हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.यापूर्वी ही शिवसेना व भाजपात अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. मागील 2014 ची विधानसभा वेगवेगळे लढले व नंतर एकत्र आले. मुंबई महापालिकेची निवडणूक सुरू असताना सत्तेत एकत्र पण त्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात राहिले. यानंतर लोकसभेच्या अगोदर खूप ताणाताणी व नंतर एकत्र , विधानसभेपूर्वी जागा वाटपावरून खूप खेचाखेची पण नंतर महायुतीच्या जागा वाटपावर एकमत व अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर. आता ही सत्ता स्थापन करताना चर्चा खूपच रंगल्या आहेत . कदाचित दिवाळीचा फराळ करून नंतरच यावर तोडगा शोधला जाईल आणि तोवर माध्यमं व जनता केवळ तर्क लढवित राहतील तर विरोधी पक्षांना आपण सत्ताधारी होवू याची स्वप्न पाहण्याची संधी मिळेल. सर्वात शेवटी दिल्लीश्‍वरांची मुंबई वारी होईल व मातोश्रीवर सर्वसमावेश तोडगा निघेल. यानंतर संयुक्त पत्रकार परिषद होवून फॉर्म्युला सांगितला जाईल आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही दोन्ही पक्ष एकत्रच असतो असे सांगत येथे कोणी लहान आणि मोठा भाऊ नाही. सारे समान आहेत याचा पुनर्घोष होईल असे वाटते. दिवाळीनंतर देव दिवाळी असते..तोवर तोडगा निघेल ..नक्की. पण  सर्वात मोठा प्रश्‍न तसाच..आमच ठरलंय ..पण काय .. हे गुलदस्त्याच असणार आहे आणि ते तसेच असण्यात सर्वांचे हित आहे कारण दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये जनतेला काही तरी करमणूक व चर्चेला विषय हवा असतोच.सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!