आषाढीच्या तोंडावर कोरोना रूग्णसंख्येत वाढ, पंढरपूर तालुक्यात शनिवारी 131 ची नोंद

पंढरपूर – आषाढीच्या तोंडावर सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये शनिवारी 473 नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून यात पंढरपूर तालुक्यातील 131 जणांची नोंद आहे. यामुळे या तालुक्यातील एकूण कोेरोना रूग्णांचा आकडा हा 27 हजार 182 इतका झाला असून आज या तालुक्यात 2 जणाच्या मृत्यूची नोंद आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये आजवर सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात 27 हजार 182 आढळून आले असून यापैकी 522 जणांचा मृत्यू झाला आहे तर 26 हजार 46 जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या 614 जणांवर उपचार सुरू आहेत. शनिवारच्या अहवालानुसार पंढरपूर शहरात 24 तर ग्रामीण भागात 107 नव्या रूग्णांची नोंद आहे. आजवर शहरात 8 हजार 507 तर ग्रामीण भागात 18 हजार 675 रूग्णांची नोंद आहे. शहरातील 184 जणांनी तर ग्रामीणमधील 338 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. सध्या शहरातील 82 तर ग्रामीणमधील 532 जणांवर उपचार सुरू आहेत.
आषाढीसाठी येणार्‍या मोजक्या भाविकांसाठीही आरोग्य यंत्रणा सज्ज
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूरमध्ये आषाढी यात्रा भरत नसली तरी ती प्रतीकात्मकरित्या साजरी होत आहे. यासाठी दहा मानाच्या पालख्या येथे येत असून त्यांच्यासमवेत चारशे भाविक असणार आहेत. या भाविकांची कोरोना चाचणी ज्या त्या तीर्थक्षेत्रात होत असून पंढरीत येताना आरटीपीसीआर अहवाल बंधनकारक आहे. याच बरोबर पंढरपूरमध्ये ही प्रशासनाच्या वतीने पन्नास बेड कोरोना हॉस्पिटलमध्ये राखीव ठेवण्यात आले असून सर्व औषधसाठा ही उपलब्ध करून देण्यात आला आहे. म्युकरमायकोसिसचा धोका पाहता याची औषधही येथे आणून ठेवल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव संपलेला नसून प्रशासनाने येथे सर्वतोपरी खबरदारी घेतली असल्याचे सांगून सचिन ढोले म्हणाले, ज्या मठांमध्ये संत पादुका व वारकरी असणार आहेत येथे सॅनिटायझर, मास्कचा पुरवठा केला जाणार आहे. तसेच रूग्णवाहिका ही शहरात तयार असणार आहेत. भाविक कमी संख्येने असले तरी जरी कोणाला रूग्णालयात दाखल करण्याची वेळ आली तरी बेडस् राखीव ठेवण्यात आले आहेत.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!