आषाढीच्या नियोजनाची वारकरी फडकरी दिंडी समाजाची बैठक रद्द

पंढरपूर– आषाढी वारीचे नियोजन करण्यासाठी चैत्र शुध्द दशमीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे होणारी वारकरी फडकरी दिंडी समाजाची बैठक रद्द करण्यात आली असल्याची माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाजाचे अध्यक्ष ह. भ. प. मारुती महाराज कोकाटे यांनी दिली .
श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर या आषाढी वारीचे नियोजन करण्या संदर्भात श्री क्षेत्र पंढरपूर येथे चैत्र शुध्द दशमीला म्हणजे शुक्रवार दि . ३ एप्रिल रोजी रात्रो ९ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज मठात बैठक आयोजित करण्यात आली होती . परंतु सध्या जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले असून गावोगावच्या जत्रा , यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत .मंदिरांना ही दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे . देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी देशभर लाँकडाऊन लागू केले आहे .अशा परिस्थितीत देशावर आलेले हे संकट दूर करण्यासाठी सर्वानीच सहकार्य करणे गरजेचे आहे .

चैत्री वारीला राज्यभरातून सुमारे ३ ते ४ लाख वारकरी श्री क्षेत्र पंढरपूरला येतात .
पंढरीची वारी आहे माझ्या घरी l
आणिक न करी तीर्थव्रत ll
हे जरी संतवचन असले तरी सर्वजण एकत्र आल्याने कोरोना हा संसर्गजन्य रोग सर्वत्र पसरण्याची भीती आहे . त्यामुळे ही महामारी आटोक्यात येण्याऐवजी त्याचा प्रसार होण्याची मोठी भीती आहे . त्यामुळे यंदाच्या चैत्री वारीलाही वारकरी , फडकरी समाजाने येवू नये असे आवाहनही ह. भ. प. कोकाटे यांनी केले आहे . दरम्यान यापूर्वी पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची चैत्री यात्रा रद्द केल्याचे जाहीर केले आहे.

5 thoughts on “आषाढीच्या नियोजनाची वारकरी फडकरी दिंडी समाजाची बैठक रद्द

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!