आषाढीबाबत खूप विचाराने निर्णय घेतला आहे, वारकर्‍यांनी नाराज होवू नये : अजितदादा

राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी www.vedhak.com ला जरुर भेट द्या.
पुणे – शेकडो वर्षाची आषाढी वारीची परंपरा टिकली पाहिजे मात्र कुंभमेळ्यात जे घडले याची पुनरावृत्ती होवू नये याची दक्षता घेण्यासाठी पायी वारीस परवानगी देण्यात आलेली नाही. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व गोष्टींचा विचार करुनच राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वारकरी समाजाने नाराज होवू नये व शासनाला व समाजाला सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले .

शुक्रवारी पुण्यात पवार यांनी आषाढी पायी वारीबाबत राज्य शासनाचा निर्णय जाहीर केला व गतवर्षी यंदाही पायी वारी रद्द करुन बसेसच्या माध्यमातून संतांच्या पादुका पंढरपूरला नेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर देहू संस्थानने निर्णयाचा फेर विचार करावा अशी मागणी केली. यावर पवार यांना विचारले असते त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, शासनाने पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय अधिकारी व वारकरी प्रतिनिधी यांची समिती नेमली होती. यात पालखी मार्गावरील जिल्ह्यामधील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक,आयुक्त व वारकरी प्रतिनिधी होते. वारी बाबतचा निर्णय जाहीर करताना आम्हालाही फार समाधान वाटले असे नाही. वारी ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ती टिकलीच पाहिजे. परंतु परंपरा टिकविताना राज्यावर जे कोरोनाचे सावट आल आहे ,त्याचाही विचार करावा लागतो. विभागीय आयुक्तांनी सर्वांशी चर्चा करुनच आपला अहवाल दिला आहे. आम्ही कोणाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला नाही. गतवर्षीपेक्षा यंदा जादा सवलत दिली आहे. वाखरी ते पंढरपूर पायी दिंडी जाण्यास परवानगी दिली आहे. मोठ्या प्रमाणात चालत गेल्यानंतर वारीचा कुंभमेळा होवू नये. मात्र परंपराही टिकली पाहिजे ही आमची भावना आहे. आम्ही समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे.

वारकर्‍यांनी सहकार्य करण्याचे आवाहन

माझी राज्यातील तमाम वारकरी बांधवांना विनंती आहे तुमच्या जशा भावना तीव्र आहेत तशा आमच्याही भावना आहेत. तुमच्या भावनांचा मी आदर करता. राज्यातील जनतेचे आरोग्य, कोरोनाचे संकट याचाही विचार झाला पाहिजे. बरेच तज्ज्ञ लोक सांगतात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे आणि ती लहान मुलांना जास्त बाधित करेल अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे राज्याच्या प्रमुखांना निर्णय घेताना या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामुळे वारकर्‍यांनी सहकार्य करावे व यंदाही मर्यादित वारकर्‍यांसह बसद्वारेच आषाढी वारीचा सोहळा पार पाडावा. याबाबत काही फेरविचार होइल असे मला वाटत नाही.
अजित पवार, उपमुख्यमंत्री
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!