एकादशी दिवशी बाहेरचे भाविक पंढरीत येणार नसल्याने स्थानिक नागरिकांना दर्शनासाठी सोडावे, येणाऱ्या सर्व स्थानिक भाविकांना मास्क, सॅनिटायझर व हॅन्डग्लोज पुरविण्याची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना घेईल.
–दिलीपबापू धोत्रे सरचिटणीस महाराष्ट्र मनसे
पंढरपूर– यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर आषाढी यात्रा रद्द झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने येणारे भाविक पंढरीत येणार नाहीत. हे पाहता एकादशीच्या महापर्वास देवाला भक्तांवाचून रहावे लागणार असून त्यासाठी किमान एकादशीस पंढरपूरकर नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करीत श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे केली आहे.
प्रतिवर्षी आषाढी यात्रेसाठी लाखो भाविक पंढरपुरात येत असतात.या भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे एकादशी दिवशी श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी २५ ते ४0 तास लागतात याचा मोठा ताण पंढरपूर शहरावर व मंदिर समितीवर येत असतो. स्थानिक नागरिक यात्रा कालावधीत आपल्या उद्योगात व्यस्त असतो. तसेच आलेल्या भाविकांना दर्शन घेता यावे म्हणून स्थानिक नागरिक आषाढी झाल्यावर दर्शनास जातात. आषाढी एकादशीला श्रीविठ्ठलाचे दर्शन घेणे पंढरपूरकर भाविकांना कधीही शक्य होत नाही. मात्र यंदा आषाढी यात्राच होणार नसल्याने श्रीविठठ्लाचे मंदिर सुनेसूने असणार आहे.त्यामुळे यंदा १ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीस स्थानिक भाविकांना श्रीविठ्ठल दर्शनासाठी परवानगी द्यावी.
पंढरीचा पांडुरंग हा २८ युगे भक्तांसाठी कमरेवर हात ठेवून उभा आहे.भक्त आले नाहीत तर देवालाही करमत नाही.कोरोनामुळे गेले तीन महिने भाविकांसाठी मंदिर बंद असल्याने कोणत्याही भाविकाला आपल्या प्रिय देवाचे दर्शन घेणे शक्य झालेले नाही. भाविकांच्या दृष्टीने आषाढी एकादशीला अनन्य साधारण महत्व आहे.या पवित्र व महत्वाच्या दिवशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरच्या भाविकांना पंढरपूरचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. श्रीविठ्ठलाच्या कृपेने पंढरपूर कोरोना पासून मुक्त आहे त्यामुळे पंढरीच्या नागरिक भक्तांना तरी विठुरायाचे दर्शन घेवू द्यावे अशी आपली मागणी असून दर्शनासाठी गर्दी होवू नये म्हणून शहराचे प्रभाग निहाय भाग पाडून प्रत्येक भागाला ठराविक वेळ देण्यात यावी. त्यासाठी मास्क वापरुन,सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे व सॅनिटायझरचा वापर करुन व स्थानिक भाविकांचे पंढरपूरचे रहिवाशी असल्याचा पुरावा पाहूनच दर्शनासाठी सोडण्यात यावे अशी मागणी दिलीप धोत्रे यांनी मंदिराचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या प्रसंगी मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड ,मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील,शहराध्यक्ष नागेश इंगोले, सिध्देश्वर गरड व समाधान डुबल उपस्थित होते.