एक दिवसाच्या शुभेच्छा पुरत्या महिला मर्यादित आहेत का ?

सौ. कांचन पाटील, पुणे 
प्रिय मैत्रिणींनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. खरं तर आजच्या एकाच दिवसात मोबाईल, टीव्ही,सोशल मीडिया सर्वजणांना अचानक खूप शुभेच्छा द्याव्या असे वाटू लागेल. पण त्या एकाच दिवसापुरत्या, सामाजिक पुळका दाखविण्यासाठी, पण आपण खरचं तेवढ्यापुरत्याच मर्यादित आहोत का ? ..अरे आपण आहोत.. झाशींची राणी, इंदिरा गांधी, आनंदीबाई गोखले यांच्या वंशज. मग शुभेच्छा तर दररोजच मिळायल्या हव्यात. किंवा कदाचित आपणाला त्याची गरज ही नाही, इतक्या कणखर आणि आत्मनिर्भर आपण झालो आहोत.
मी काही लेक्चर वगैरे देत नाही. राजकारणापासून  समाजकारण , अर्थशास्त्र, शेती, घरदार आणि संसार सगळ्या आघाड्यांवर लढणार्‍या स्त्रिया आज केवळ भारताचा नव्हे तर जगाचा आरसा बनल्या आहेत. राजकीय क्षेत्रात ठसा उमटविणार्‍या सुप्रियाताई सुळे, फौजिया खान यांच्यापासून ते छोट्या खेड्यातील सरपंच ही राजकीय कार्यात अग्रेसर दिसतात. डॉ. मंदाताई आमटे, डॉ. स्मिता कोल्हे यांनी दुर्गम आदिवासी भागात काम करून सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. इंद्रा नूरी, चंदा कोचर यांनी बॅकिंग क्षेत्रात जागतिक पातळीवर काम केले आहे. शैक्षणिक क्षेत्रात कुसूम थोरात, माया शिंदे या बालभारती पुणे यांचे काम यशस्वीपणे सांभाळत आहेत. डॉक्टर्स असणार्‍या असंख्य भगिनी रूग्णांना नवजीवन देण्याचे व सेवा- सुश्रृषा करण्याचे काम अखंडपणे करत आहेत. त्यांच्या सोबत असंख्य अंगणवाडी सेविका आणि ताई   छोट्यांना सांभाळणे व संस्कार करण्यात मग्न असतात. भजन ,कीर्तनातून सामाजिक प्रबोधनाचे काम बीडच्या रेश्मा पाटील तर पंढरपूरच्या चंदाताई तिवाडी या भारूडाद्वारे करत आहेत.  ही सर्व हिमनगाची टोके आहेत..पण त्याखाली दडला आहे. अनेक शतकांचा अविश्रांत प्रवास. ठामपणे पण हळू हळू होत चाललेली वाटचाल आहे. देशाच्या संरक्षणासाठी आपला मुलगा दिलेल्या असंख्या माता असोत की वीरपत्नी किंवा रोज शेतात राबून लेकरांसाठी खाऊ आणणारी शेतमजूर स्त्री असो. ही सर्व त्याचीच उदाहरणे आहेत.
त्या त्या क्षेत्रात स्त्री आपल्या असामान्य कर्तृत्वाने अंगभूत गुणांनी , चिकाटीने सतत कार्यरत राहून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असली तरी या  सर्व चांगल्या बाजूच्या मागे न दिसणारी चीड, उद्वेग आणणारी काळी बाजू ही आहे. दुष्कर्म, अत्याचार, मानसिक खच्चीकरण, सामाजिक व मानसिक शोषण याविरोधात आवाज उठविण्यात न आल्याने होणारी घुसमट हे सर्व कसे थांबविणार ? हा खरा प्रश्‍न आहे.
जिजामाता पासून राजस्थानच्या रामप्यारी पर्यंत सर्वांनी अन्यायाचा प्रतिकार, सामाजिक बदल करायला शिकविले. ते आपण किती आचरणात आणणार ? हे तपासण्याची वेळ आता आली आहे. प्रत्येक सुविचारी, शिक्षित स्त्रीने याचा विचार करून बदलाची सुरूवात आपल्या घरापासून , स्वतःपासून करावी.
उद्याचा सुंदर भविष्यकाळ तुमची वाट पाहात आहे. हातात हात घालून आपण सार्‍या जणी हे सुंदर वर्तमान घडवू या..याच या निमित्ताने शुभेच्छा..
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!