एमफील आणि पीएचडीचे संशोधन प्रबंध सादर करण्यास सोलापूर विद्यापीठाकडून सहा महिन्यांची मुदतवाढ
सोलापूर, दि.7– कोविड-19 आणि लॉकडाऊनमुळे शैक्षणिक संस्था मागील काही दिवस बंद होते. त्यामुळे शैक्षणिक कामकाजावर मोठा परिणाम झालेला आहे. आता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार एमफील आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांना संशोधन प्रबंध सादर करण्यास कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.
यासंदर्भात विद्यापीठाच्या संशोधन व पीएचडी विभागाकडून एक परिपत्रक काढण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात, शैक्षणिक संस्थांमध्ये व मान्यताप्राप्त संशोधन केंद्रामध्ये एमफील व पीएचडी अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांचे संशोधन प्रबंध सादर करण्याची मुदत 25 मार्च ते 30 जून 2020 या कालावधीची होती. म्हणजे या काळात संपूर्ण देशात लॉकडाऊन होता. या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी संशोधन प्रबंध सादर करण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.
आता संबंधित विद्यार्थ्यांना आपल्या एमफील व पीएचडीचा संशोधन प्रबंध सादर करण्यासाठी नियमानुसार विहीत प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. ती प्रक्रिया पूर्ण करून विद्यापीठाकडे संशोधन प्रबंध सादर करावयाचे आहे. 1 जानेवारी ते 30 जून 2020 पर्यंतचे संशोधन प्रगती अहवाल सादर करण्याची मुदत 30 जून रोजी संपणार होती. अशा विद्यार्थ्यांकडून कोणताही दंड न घेता संशोधन प्रगती अहवाल स्विकारण्यात येणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विकास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एमफील व पीएचडीच्या विद्यार्थ्यांचे संशोधन प्रबंध विद्यापीठाकडून स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी दिली.