कार्तिकीबाबत वारकरी संप्रदायाची भूमिका योग्यच, शासनापर्यंत ती पोहोचविण्याची राज ठाकरे यांची ग्वाही

मुंबई,ता.11ः आगामी कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने वारकरी संप्रदायाची भूमिका योग्य असून ती शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वारकरी संप्रदाय कार्तिकी यात्रा समन्वय समितीच्या शिष्टमंडळास आज दिले.

वारकरी संप्रदाय कार्तिकी यात्रा समन्वय समिती शिष्टमंडळाची बुधवार 11 नोव्हेंबर रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत कृष्णकुंज येथे बैठक पार पडली. कोरोनामुळे वारकरी संप्रदायाने मागील 8 महिन्यांपासून आषाढी यात्रेसह विविव उत्सव काळात अनेक निर्बंध सोसत शासनास सहकार्य केले आह.मात्र आता बाजारपेठांसह सर्व गोष्टी खुल्या होत असताना येत्या कार्तिकी यात्रेसाठी शासनाने निर्बंध लादू नयेत या करिता स्वतः संप्रदायाने कार्तिकी यात्रा नियोजन आराखडा तयार केला आहे.त्यानुसार यात्रा पार पाडावी. अशी मागणी करण्यात आली होती. त्यास प्रतिसाद देत वारकरी संप्रदायाला चर्चेसाठी आमंत्रित करत त्यांची भूमिका राज ठाकरे यांनी आज समजून घेतली.
या बैठकीस मनसेचे बाळनांदगावकर,नितीन सरदेसाई, दिलीप धोत्रे, राणा महारास वासकर, चैतन्य महाराज देहूकर, निवृत्ती महाराज नामदास, भागवत महाराज चवरे, रंगनाथ महाराज राशीनकर, विठ्ठल महाराज चवरे, भरत महाराज आलीबागकर,श्याम महाराज उखळीकर उपस्थित होते.

वारकरी संप्रदायाची भूमिका तथा प्रस्ताव
१) ‘कार्तिकी यात्रा समन्वय समिती’ च्या माध्यमातून यात्रा निर्बंधांऐवजी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी सकल वारकरी संप्रदाय, शासन-प्रशासन व पंढरपूकर नागरिक यात समन्वयाचा प्रयत्न.
२) कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरमध्ये प्रत्येक वारकरी संप्रदाय मठात किमान ५० (शक्यतो वय वर्षे ५० चे आतील) वारकऱ्यांना सामाजिक अंतर राखणे, मुखावरण (मास्क), निर्जंतुकीकरण द्रावण(सॅनिटायझर), वापरणे इ. उपाययोजनांसह सप्तमी ते पौर्णिमा या कालावधीत निवास, भजन, कीर्तन करण्यास प्रतिबंध नसावा. या व्यतिरिक्त वैयक्तिक वारीस येणाऱ्या वारकऱ्यांना मुक्कामास थांबवू नये.
३) पंढरपुर कार्तिकी यात्रेसाठी ज्या दिंड्या बाहेरगावाहून पायी चालत येतात त्या दिंडी मध्ये वारकऱ्यांची संख्या १० पेक्षा जास्त नसावी. वर दिलेले कोरोना प्रतिबंधात्मक सर्व आरोग्यसुरक्षा उपाय केलेले असल्यास या दिंड्यांना प्रवेशास प्रतिबंध करु नये.
४) यावर्षी ६५ एकर सारख्या व इतरही तंबू, राहुट्यामधील उघड्यावरील तात्पुरत्या निवासास प्रतिबंध असावा.
५) चंद्रभागा (नदी) स्नान हा वारकरी परंपरेचा अविभाज्य भाग असल्याने सामाजिक अंतर राखत, गर्दी होणार नाही याची दक्षता घेत व यासाठी समन्वय समितीशी चर्चेद्वारे उपाययोजना करत चंद्रभागा स्नानाची योग्य ती व्यवस्था करावी.
६) एकादशी हा मुख्य दिवस असून या दिवशी सर्व फडांच्या दिंड्या नगरप्रदक्षणेसाठी निघतात. या प्रत्येक दिंड्यांत २५ पेक्षा जास्त वारकरी नसावेत तसेच सर्व वारकरी हे सामाजिक अंतर व इतर आरोग्य सुरक्षा उपायांसह सहभागी असावेत. या सर्व दिंड्यांना नगरप्रदक्षणेसाठी सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंतची निर्धारित वेळ असावी. दोन दिंड्यांमध्ये योग्य सामाजिक अंतर असावे. गर्दी होणार नाही याची काळजी दिंडीप्रमुखांनी घ्यावी. (कार्तिक शुद्ध पंचमीस सकाळी ९ ते दुपारी १ व नवमीस रात्री आठ ते पहाटे पाच पर्यंत काही फडांच्या परंपरेच्या नगरप्रदक्षणेसाठी दिंड्या असतात त्यांनाही वरील नियमांसह प्रतिबंध नसावा.)
७) पौर्णिमेच्या दिवशी वारकरी संप्रदाय नियमांप्रमाणे श्रीक्षेत्र गोपाळपूर येथे किर्तनासह ‘गोपाळकाला’ करण्यास साठी दिंड्या जातात त्यामध्ये प्रत्येक दिंडीत १० वारकरी असतील. यास कोणतीही हरकत नसावी.
८) दुसरे दिवशी प्रथेप्रमाणे ‘महाव्दारकाला’ होतो तो अल्पसंख्येत का असेना पार पडणेस हरकत नसावी.
९) यात्रा कालावधीत सामाजिक अंतर राखणे, मुखावरण (मास्क) चा वापर करणे बंधनकारक होणेसाठी पोलिस यंत्रणेला ताण न देता वारकरी संप्रदाय व पंढरपुर मधील सामाजिक संघटनांच्या समन्वयातून ‘कोविड वॉरियर्स’ नेमून त्यांचे द्वारे प्रबोधनात्मक व्यवस्था करण्यात यावी.
१०) गेले जवळपास 8 महिने श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद आहे ते सुरक्षा उपायांसह उघडण्यास हरकत नाही.मात्र या उपरही शासन ते उघण्यास तयार नसल्यास किमान मंदिराचा मुख्य दरवाजा ( श्रीसंतनामदेव महाराज पायरीवरील पितळी महाद्वार) बंद न ठेवता, नित्योपचार वेळापत्रकानुसार तो उघडण्यात यावा.
जेणेकरुन श्रीविठ्ठल व रुक्मिणी माता यांची कृपादृष्टी आपल्यावर पडते आहे असा विश्वास वारकरी भक्तांमध्ये निर्माण होईल व दर्शनासाठी व्याकूळ झालेल्या मनाला थोडे समाधान लाभेल. तसेच महाव्दार, पश्चिमव्दार, नगरप्रदक्षणा मार्ग व चंद्रभागा वाळवंट या ठिकाणी श्रीविठ्ठल रुक्मिणी दर्शनाचे थेट प्रक्षेपण ‘डिजिटल स्क्रीन’ द्वारे करण्यात यावे. लांबूनच श्रीसंत नामदेवराय, चोखोबाराय तसेच श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिराचे कळसदर्शन हा किमान हक्क वारकऱ्यांचा अबाधित असला पाहिजे. याकरिता मंदिर परिसरात यात्रा काळात कोणत्याही प्रकारची संचारबंदी लादू नये.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!