पंढरपूर – साखरपट्ट्यातील राजकारणात आपले भक्कम स्थान निर्माण केलेले व आमदारकी मिळविण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांचे मन आता भारतीय जनता पक्षावरून ही उडले असून ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यांच्या याबाबतच्या हालचाली सुरू आहेत. यापूर्वी काँग्रेस, शिवसेना यानंतर भाजपा त्यांनी काम केले आहे. जर आता ते राष्ट्रवादीत गेले की पक्षांतराची चौकट पूर्ण होणार आहे.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर काळे यांच्या भाजपाला सोडचिठ्ठी देण्याच्या वृत्ताने सध्या जोर धरला आहे. भाजपापासून ते दूर होणार हे निश्चित दिसून असून त्यांना ज्यांनी भाजपात आणले त्या देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांनी आपल्याला पक्षत्याग करावा लागणार असल्याचे सूचित केले आहे. यानंतर भाजपाचे काही नेते ज्यात आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, बाळा भेगडे यांनी त्यांची भेट घेवून त्यांना पक्षात राहण्याचा आग्रह केला मात्र काळे हे राष्ट्रवादीत जाण्याचे मन पक्के करून बसले आहेत असे सांगितले जाते.
सध्या पोटनिवडणुकीचे वातावरण तापले असून अवघ्या दहा दिवसावर मतदान आले असताना काळे गट ना भाजपाच्या ना राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसत आहे. यामुळे सहाजिकच त्यांच्या समर्थकांसह तालुक्याचे लक्ष कल्याणरावांच्या भूमिकेकडे लागले आहे. काळे यांचे वडील कै. वसंतराव काळे यांनी 1996 नंतर काँग्रेसमधून बाहेर पडून शिवसेनेत जाणे पसंत केले व आपल्या चंद्रभागा कारखान्याच्या अडचणी कमी केल्या. यानंतर त्यांनी 2001 मध्ये पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या निधनानंतर कल्याणराव काळे यांनी चंद्रभागा परिवाराचा सांभाळ केला. अनेक वर्षे राजकारणात असणार्या या प्रबळ गटाला आमदारकीची आस आहे. मात्र विधानपरिषद व माढा विधानसभा लढूनही त्यांना यश मिळालेले नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी कल्याणराव काळे यांनी एक दिवसासाठी शिवसेनेत प्रवेश केला मात्र तिकिट मिळत नाही हे लक्षात येताच पुन्हा स्वगृही परतले.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला. दोन वर्षे कसेबसे ते तेथे ते रमले मात्र आता पुन्हा त्यांना राष्ट्रवादीचा रस्ता खुणावू लागला आहे. आमदार कै. भारत भालके यांच्या निधनानंतर एकसंघ विठ्ठल परिवार राखण्यासाठी काळे यांनी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना पक्षात आणण्याचे ठरविले आहे. त्यांच्या कारखान्यालाही मदत केली आहे. यामुळे काळे हे हातावर घड्याळ बांधण्याच्या तयारीत आहे. जर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर त्यांचा हा चौथा पक्ष असणार आहे.
दोन साखर कारखाने, बँक, दूध व शैक्षणिक संस्था यासह अनेक ग्रामपंचायती या काळे गटाकडे आहेत. तसेच हा गट सांगोला, माढा, मोहोळ विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या तालुक्यातील गावांमध्ये सक्रिय आहे. यामुळे सहाजिकच प्रत्येक पक्षाला काळे आपल्याकडे यावेत असे वाटते. ताकद असूनही आजवर कल्याणराव काळे यांना आमदारकीपासून दूर राहावे लागले आहे व हीच खंत त्यांच्या समर्थकांना आहे. त्यांनी यापूर्वी माढ्यात राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांना आव्हानं देवून पाहिले आहे तर विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी दीपक साळुंखे यांच्या विरोधात उमेदवारी दाखल केली होती.
आता ते राष्ट्रवादीत आल्यास याचा फायदा पक्षाला व पयार्याने भगीरथ भालके यांना होणार आहे. या मतदारसंघात परिचारक व आवताडे एक झाले असल्याने आता राष्ट्रवादी भालके व काळे यांना एकत्रित आणून येथे विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे हे निश्चित.