कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री पांडुरंग पालखी सोहळ्याचे बसमधून आळंदीकडे प्रस्थान
पंढरपूर– कार्तिकी वद्य त्रयोदशीला श्रीक्षेत्र आळंदी येथे होत असलेल्या श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपूरपूह श्री पांडुरंगाच्या पादुका पालखीतून नेण्याचा उपक्रम 2014 पासून सुरू असून यंदा कोरोनाचे संकट पाहता प्रथमच श्रींच्या पादुका एसटी बसमधून आज नेण्यात आल्या आहेत.
यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता श्री पांडुरंंगाचा पालखी प्रतीकात्मक व मर्यादित स्वरूपात ठेवण्यात आला आहे. यासाठी राज्य शासनाची मान्यता घेण्यात आली आहे. 11 डिसेंबर रोजी पालखीचे प्रस्थान आळंदीकडे राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून झाले असून 13 तारखेला संजीवन समाधी सोहळा आहे. दरम्यान शुक्रवारी सकाळी श्री विठ्ठल मंदिरात पांडुरंगाच्या पादुकांचे विधीवत पूजन झाले. यानंतर या आकर्षक फुलांनी सजविलेल्या बसमध्ये ही पालखी ठेवण्यात आली. यावेळी मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज देशमुख (जळगांवकर), प्रकाश महाराज जवंजाळ तसेच व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, विभाग प्रमुख बलभिम पावले व मंदिर समितीचे कर्मचारी तसेच वारकरी/भाविक उपस्थित होते. वीस वारकर्यांसह श्रींच्या पादुका या बसमधून आळंदीला माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी नेण्यात आल्या आहेत. आज श्री पांडुरंगांच्या पालखीसमवेत भक्त पुंडलिक आणि संत नामदेव महाराज यांच्याही पादुकांचे प्रस्थान आळंदीकडे झाले.