कोरोनाबाधित व त्यांच्या कुटुंबाला मदत करणारा विशाल मनाचा पंढरीतील युवक

पंढरपूर- कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे जगातील वैद्यकीय क्षेत्रासह या महामारीशी लढणारी यंत्रणा सोडून सारेच जण माणूसपण हरवून बसले आहेत. या आजाराचा संसर्ग झालेल्यांपासून तर लोक दूर पळतात मात्र त्यांच्या कुटुंबालाही मदत करण्यासाठी पुढे येत नाहीत. अशात पंढरपूरमधील एक युवकाचा आदर्श घेण्यासारखा आहे. त्याच्या ओळखीच्या एका काकांना व त्यांच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्यानंतर या युवकाने त्यांना खूप मदत तर केली मात्र काकू ज्या घरी एकट्याच होत्या त्यांच्यासाठी तो धावपळ करत होता.

या विशाल मनाच्या युवकाचे नाव ही योगायोगाने विशाल आर्वे असे आहे. शहरातील लिंकरोड भागात राहणार असून या भागातील 64 वर्षीय एका काकांना व त्यांच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आणि त्यांना वाखरीच्या कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले. पिता आणि पूत्र दोघे ही दवाखान्यात असल्याने विशाल आर्वे या तरूणाने त्यांना जेवणाचे डबे कोविड सेंटरमध्ये पुरविण्याचे ही काम केले. एवढेच नव्हेतर काकू ज्या घरी एकट्याच होत्या त्यांच्यासाठी मानसिक आधार देण्याबरोबर त्यांना काय हवे काय नको याची विचारपूस तो या काळात सतत करत राहिला. विशाल सांगतो वास्तविक पाहता या कुटुंबाची माझी फारशी ओळख नाही केवळ माहिती आहे. कधीही संवाद नव्हता. मात्र जेंव्हा काका व त्यांच्या मुलाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे हे कळले तेंव्हा त्यांना मदत करावी असे मनापासून वाटले.

काकांचे वय 64 असून त्यांना मधुमेहाचा त्रास आहे. पहिले चार दिवस त्यांना वाखरीच्या कोविड केअर सेंटरमध्ये असताना काही त्रास झाला नाही मात्र नंतर खोकला व जुलाब सुरू झाला. या काळात त्यांचा अशक्तपणा वाढल्याने त्यांना सोलापूरला हलविण्यात आले. तेथे ऑक्सिजन , सलाईन देण्यात आले. यातच त्यांना निमोनिया झाल्याचे निष्पन्न झाले. या काळात त्या काकांना सोलापुरात आपल्या परीने शक्य होईल ती मदत करण्याचा प्रयत्न करत होते. काकांना सोलापूरला हलविल्यानंतर त्यांचे नातेवाईक ही घाबरले होते. यातच घरात एकट्या असणार्‍या काकूंना मानसिक आधाराची ही खूप गरज होती. विशालने यासाठी पुढाकार घेतला.

वास्तविक पाहता विशालच्या घरी ही आई वडील आहेत तसेच लहान मुले आहेत. सध्याची कोरोना परिस्थिती पाहता तो जे मदतीचे काम करत होता हे पाहून त्याला त्याच्या कुटुंबातील सदस्य ही रागावत होते मात्र याबाबत बोलताना विशाल म्हणतो, इतरांना संकटकाळात मदत करणे आणि कुणाच्या तरी कामी येणे ही भावना सुखावणारी आहे. सुख हे आपल्या भोगात नाही तर त्यागात व दुसर्‍यांना मदत करण्यात आहे हे नक्की.
कोरोनावर मात करून आता हे 64 वर्षीय काका व त्यांचा मुलगा दोघेही आता घरी परत आले आहेत. त्यांचे स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!