कोरोनाबाबत लग्नासह सार्वजनिक कार्यक्रमात दक्षता घेण्याचे आवाहन

पंढरपूर, दि.4 -कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जिल्ह्यासह ग्रामीण भागातही दिवसेंदिवस वाढत आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम व लग्नसमारंभावर शासनाने घातलेले निर्बंध कमी केले आहेत. यामुळे अशा ठिकाणी गर्दी केल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी असे, आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.
नागरिक ज्या ठिकाणी एकत्र येतात तेथे सामुहिक संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.लग्न समारंभाच्या निमित्ताने वेगवेळ्या भागातून आप्तस्वकीय येत असतात. त्यातील काही नातेवाईक व नागरिक रेड झोनमधून येत असून, त्यांचा कार्यक्रमात सहभाग असतो. ग्रामीण भागात बाधित रुग्णांची संख्या रेडझोन आलेल्या नागरिकांमुळे वाढली असल्याचे ढोले यांनी सांगितले.
तालुक्यात नियोजित लग्नसमारंभ अथवा इतर सार्वजनिक कार्यक्रम, बैठका आप्तस्वकीय व निमंत्रितांच्या उपस्थित पार पाडावेत. उपस्थित नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आयोजकांची असेल. कार्यक्रमास व इतर सार्वजनिक बैठकीस गर्दी होणार नाही अशा स्वरुपात कार्यक्रमाचे आयोजन करावे. यापार्श्‍वभूमीवर सर्व मंगल कार्यालये, विविध सामाजिक संस्था, नागरिकांनी विविध संस्था,संघटना यांनी लग्नसमारंभ व इतर कार्यक्रम साजरे करताना साधेपणाने साजरे करावेत. जेणेकरुन कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करणे शक्य होईल.असे प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.
प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न करणार्‍या आयोजक व्यक्ती, संस्था यांच्यावर साथरोग प्रतिबंध कायदा व आपत्ती व्यवस्थापन अतंर्गत कारवाई करण्यात येईल. तसेच लग्नसमारंभ व इतर कार्यक्रम मर्यादित नागरिकांच्या उपस्थित साजरे करावेत. कार्यक्रमात रेडझोनमधून आलेल्या नागरिकांचा संपर्क येणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!