कोरोनामुक्तीचा पंढरपूर पॅटर्न !

सोलापूर शहराखालोखाल मोठे असणार्‍या पंढरपूर शहराला कोरोनामुक्त करणे त्याचबरोबर याचा प्रसार होऊ न देण्यासाठी महसूल, पोलीस, आरोग्य, जिल्हा परिषद आणि माहिती कार्यालयाने अतिशय समन्वयाने काम केले. त्यामुळेच आज पंढरपूर कोरोनामुक्त होऊ शकले. याबाबतचा हा लेख..

लेखक -अविनाश गरगडे, उपमाहिती कार्यालय, पंढरपूर.

पंढरपुरात शहरी आणि ग्रामीण भागात आठ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आल्याने सर्वांना धक्का बसला. पंढरपूर तालुका कोरोनामुक्त ठेवण्यासाठी येथील प्रशासकीय अधिकार्‍यांनी केलेल्या ‘पंढरपूर पॅटर्नला धक्का बसतो की काय, अशी चिंता होती. परंतु बाधा झालेल्या रुग्णांना कोरोनामुक्त करण्याबरोबरच या विषाणूचा प्रसार होऊ न देण्यासाठी केलेल्या सांघिक प्रयत्यामुळे ही चिंता अल्पकालीन ठरली. आज दोन वर्षाच्या बालकाने कोरोनावर मात केली. प्रशासनाने केलेले नियोजन, कडक अंमलबजावणी ,नियमांचे काटेकोर पालन आणि योग्य समन्वयाने कोरोनामुक्तीचा पंढरपूर पॅटर्न आकाराला आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. या कालावधीत ग्रामीण व शहरी भागात कोणते नियोजन करावयाचे यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. त्यामध्ये तालुकास्तरीय नियत्रंण समितीची स्थापना करण्यात आली. समितीत प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, तहसिलदार वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, वैद्यकीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे यांनी केलेल्या काटेकोर नियोजनाला यश मिळाले. ग्रामस्तरीय समिती व शहरात वार्डस्तरीय समितीची स्थापना करुन जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याचे नियोजक करण्यात आले.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सामाजिक अंतर हाच एकमेव उपाय असल्याने. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले होते. नागरिकांना आवश्यक असणार्‍या वस्तू घरपोच देण्याची सुविधा येथील व्यापार्‍यांनी सुरु केली. शेतकर्‍यांचा भाजीपाला, दूध तसेच खाद्य पदार्थ पुरवण्याचे नियोजन करण्यात आले. येथूनच कोरोना विरुध्दच्या लढाईला पंढरपूर पॅटर्नने सुरुवात झाली.

तालुकास्तरीय शीघ्र प्रतिसाद पथकाची स्थापना.

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी तालुकास्तरीय शीघ्र प्रतिसाद पथकाची स्थापना करण्यात आली. त्या अंतर्गत सर्व गावात ग्रामस्तरीय समितीची स्थापना केली गेली. त्यामध्ये सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक-सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांचा समावेश करण्यात आला. तसेच शहरी भागातही वार्डस्तरीय समिती स्थापन करण्यात आली . या समितीकडून सर्व नागरिकांचे ili व sri चे सर्वेक्षण करण्यात आले.आणि याबाबतची सर्व माहिती संकलित करुन गुगल लिंकवर अपलोड करण्यात आली आहे

बाहेरुन आलेल्यांना संस्थात्मक व गृह विलगीकरण

तालुक्यात परराज्यातून तसेच परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक आले आहेत. पंढरपूर तालुक्यात आतापर्यंत 15 हजार 574 नागरिक बाहेरुन आले आहेत. त्यामध्ये परदेशातून आलेल्या 30 व्यक्तींचा समावेश आहे. या सर्वाची आरोग्य तपासणी करुन आवश्यकतेनुसार वैद्यकीय उपचार करुन त्यांना संस्थात्मक व होम क्वारंटाइन करण्यात आले. त्यांच्यावर ग्रामस्तरीय समिती व वार्डस्तरीय समितीचे नियंत्रण ठेवण्यात आले.

सुसज्ज, सर्व सोयीनींयुक्त कोविड केअर सेंटरची स्थापना..

वाखरी येथील एमआयटीमध्ये 250 बेडचे सुसज्ज व सर्व सोयीसुक्त कोविड केंअर सेंटर सुरु करण्यात आले. त्यामध्ये अत्याधुनिक कोविड रुग्ण तपासणी चेंबर जिल्ह्यात पहिल्यांदाच सुरु करण्यात आले. यामुळे डॉक्टरांचा व रुग्णांचा तपासणीसाठी कमी संपर्क येतो. रुग्णांची तपासणीही चांगल्या पध्दतीने होते. येथे फीवर क्लिनिक, संशयित रुग्ण, कोरोनाबाधित रुग्ण यांची वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच्यात आपआपसात संपर्क येऊ याची दक्षता घेण्यात आली आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेव्दारे लक्ष ठेवण्यात येते. लाऊडस्पीकरच्या माध्यमातून त्यांना वेळोवेळी सूचना देण्यात येतात. क्वारंटाइन केलेले नागरीक एकमेकांत मिसळले जाऊ नये. यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेचा मोठा फायदा झाला आहे.

संशियत नागरिकांचे पंढरपुरात स्वॅब घेण्याची व्यवस्था

आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार परदेशी प्रवास करुन आलेले नागरिक, बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेले नागरिक तसेच रेड झोनमधून आलेल्या व्यक्तींचे पंढरपुरातच स्वॅब घेण्यात आले. हे स्वॅब घेण्याची व्यवस्था पंढरपुराताच करण्यात आली आहे. यासाठी आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांना वेळावेळी प्रशिक्षण देण्यात आले आहे. आतापर्यंत तालुक्यात संशयित 353 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहेत.

कोरोनाची साखळी तोडण्यास प्रशासकीय यंत्रणेला यश

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिक मोठ्या प्रमाणात तालुक्यात स्वगृही परतले आहेत. येथे आलेल्या नागरिकांना आरोग्य तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. परंतु बाहेरुन आलेल्या काही नागरिकांनी स्वत:हून आरोग्य तपासणी न करता घरीच थांबले होते. प्रशासनाने रुग्ण शोध मोहीम सुरु करुन बाहेरुन नागरिकांची आरोग्य तपासणी केली. या शोध मोहिमेतच संशयित नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. त्यातच पाच नागरिक कोरोना बाधित आढळून आले. त्यांना तात्काळ उपचासाठी दाखल करण्यात आले. तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती संकलित करुन त्यांनाही तात्काळ संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले. यातील कोरोना बाधित सर्व रुग्ण बरे झाले आहेत. संपर्कातील व्यक्तींचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि कोरोनामुक्त करण्यात पंढरपूर पॅटर्नचे मोठे यश मानले जाते. कोरोनाशी लढण्याचा पंढरपूर पॅटर्न इतरांसाठी मार्गदर्शक आहे.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले कौतुक

पंढरपूर येथे नुकतीच कोरोनाबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पंढरपूर पॅटर्नचे खूप कौतुक केले. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात याप्रमाणेच अंमलबजावणी करण्यात यावी , असे त्यांनी सांगितले. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत कामकाज करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!