कोरोनामुळे पंढरपूरमध्ये बुधवारी संचारबंदीत आषाढी एकादशीचा सोहळा

पंढरपूर – कोरोनामुळे उद्या बुधवारी १ जुलै रोजी एकादशीचा सोहळा वारकर्‍यांविना तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये संचारबंदीत साजरा होत आहे. वारीची परंपरा जपण्यासाठी शासनाने मानाच्या पालख्यांना कमीत कमी भाविकांसमवेत पंढरीत आणले आहे. दरम्यान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे वारकर्‍यांचे प्रतिनिधी म्हणून पहाटे श्री विठ्ठल रूक्मिणीची शासकीय महापूजा करणार आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव देशात व राज्यात वाढतच आहे. सोलापूर जिल्ह्यात दररोज या आजाराचे रूग्ण वाढत आहेत. पंढरपूर शहरात आषाढी दशमी दिवशी सात रूग्ण नव्याने आढळून आले आहेत. कोरोनामुळे पंढरपूरच्या आषाढी यात्रेला भाविकांना पंढरीत येण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रतिवर्षी दहा ते बारा लाख भाविक येथे येत असतात यंदा मात्र संचारबंदी पुकारण्यात आली आहे. पंढरीत शांतता आहे. 17 मार्चपासून श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंदच ठेवण्यात आले आहे.
कोरोनाविषयक आरोग्याचे नियम पाळून मानाच्या पालख्या संत ज्ञानेश्‍वर , संत तुकाराम,संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताई, संत चांगवटेश्‍वर, श्री विठ्ठल रूक्मिणी संस्थान कौंडण्यपूर , संत निळोबाराय व संत नामेदव महाराज पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. संत नामदेव महाराज देवस्थान पंढरपूरलाच आहे. मंगळवारी दशमी दिवशी सायंकाळी संत नामदेव महाराजांची पालखी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून वाखरी येथे आणण्यात आली. येथे पालख्याचे स्वागत करण्यात आले. एकादशी दिवशी संतांच्या पादुकांना चंद्रभागा स्थान व नगरप्रदक्षिणा होणार आहे.
आषाढीसारख्या मोठ्या वारीवर पंढरीचे अर्थकारण अवलंबून असते मात्र यंदा साडेतीन महिने झाले मंदिर परिसरातील सर्व प्रासादिक वस्तूंची दुकाने बंद आहेत. याच बरोबर भाविकच नसल्याने याचा फटका व्यावसायिकांना बसला आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!