कोरोनाला नियंत्रित ठेवण्याची ही ख-याअर्थाने कसोटीची वेळ – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे, दि. 27 – पुणे विभागतील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या जिल्हयांत कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. कंटेनमेंट झोनमध्ये रक्तदाब, मधुमेह तसेच इतर आजार असलेल्या रुग्णांची आरोग्य तपासणी करून गतीने उपचार सुरू करावेत तसेच कोरोनाबाधितांची आढळून आलेली संख्या पाहता कोरोना प्रतिबंधासाठी परिसरनिहाय सूक्ष्म नियोजन करा, असे सांगतानाच कोरोनाला नियंत्रित ठेवण्याची ही ख-याअर्थाने कसोटीची वेळ असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयातून विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे विभागातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कोरोना प्रतिबंधासाठी कार्यरत असलेले आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा घेतला. यावेळी उपायुक्त संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, आपत्ती लक्षात घेता महानगरपालिका व इतर यंत्रणांमार्फत विविध प्रतिबंधात्मनक उपाययोजना करण्यामत येत आहेत. यासोबतच परिसरनिहाय सूक्ष्म नियोजन केल्यास अधिक प्रभावीपणे काम करणे सुलभ होईल व कोरोना प्रतिबंधासाठी उपयोग होईल. मृत्यूदर कमी करण्यासाठी अत्यंत काटेकोर नियोजन आवश्यक आहे. पल्स ऑक्सीमीटर, बीपी तपासणी तसेच शुगर तपासणीला प्राधान्य देण्यात यावे, आरोग्य सर्वेक्षण अचूक असावे व त्यातून एकही व्यक्ती सुटणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात होऊ नये याची विशेष काळजी घेणे आवश्यक असून, तालुक्याचा हद्दीत व ग्रामीण भागात बाहेरुन प्रवास करुन येणाऱ्या नागरीकांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात यावे असे निर्देशही देवून डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात होऊ नये, याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. याकरीता विशेष खबरदारी म्हणून संबंधित ग्रामीण भागामध्ये बाहेरुन प्रवास करुन जे प्रवासी, मजुर, विद्यार्थी अथवा इतर कोणताही नागरीक प्रवेश करेल, या सर्व प्रवासी, मजुर, विद्यार्थी अथवा नागरीक यांना संस्थात्मक विलगीकरण करावे. यामध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी. याबाबतचे अंमलबजावणी करीता तसेच गावपातळीवर कार्यरत असलेल्या ग्रामसेवक, तलाठी किंवा आरोग्यसेवक यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी, अशा सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.
पुणे विभागातील प्रत्येक जिल्ह्यात आतापर्यंत झालेली उपाययोजनांची अंमलबजावणी, स्थानिक स्थिती, संभाव्य स्थिती व प्रादुर्भाव थांबविण्यासाठी नव्याने करावयाचे उपाय आदी बाबींसंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला. पुणे विभागातील पाचही जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच आरोग्य यंत्रणेचे अधिकारी यांनी आपल्या जिल्हातील उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी सबंधित जिल्हा प्रशासनातील कोरोना जबाबदारी देण्यात आलेले समन्वय अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!