कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई , 13 लाख 48 हजार रुपयांचा दंड ,38 जणांवर गुन्हे

पंढरपूर, दि. 13:- तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलीस प्रशासनामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, 3 हजार 214 नागरिकांकडून 13 लाख 48 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच उल्लंघन करणाऱ्या 38 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे हा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तातडीने उपाययोजना करण्याबरोबरच विविध निर्बंधही घातले आहेत. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंढरपूर पोलीस प्रशासनाच्यावतीने शहर व ग्रामीण भागात जनजागृती करुन मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतराचे पालन करणे आदीबाबत वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. तरीही काही नागरिक नियमांचे उल्लंघन करीत आहे. अशा नागरिकांवर पोलीस प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने दिनांक 1 जानेवारी ते 12 मार्च 2021 या कालावधीत मास्क न वापरणाऱ्या 3 हजार 59 नागरिकांवर कारवाई करुन 13 लाख 32 हजार 700 रुपये व गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या 155 नागरिकांकडून 15 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंध कायद्यातंर्गत कलम 188 अन्वये 38 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहितीही श्री.कदम यांनी दिली
नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे तसेच मास्कचा वापर करावा , गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करावे, प्रशासनाने कोरोना संदर्भात दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, जे नागरिक कोरोनाबाबत नियमांचे उल्लघन करतील त्यांच्यावर दंडात्मक तसेच साथरोग प्रतिबंध कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत कारवाई करण्यात येईल अशा इशाराही उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी यावेळी दिला आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!