कोरोना साखळी तोडण्यासाठी अकलूजमध्ये तीन दिवस संचारबंदी

अकलूज, दि. २१ – अकलूज शहर व परिसरात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांच्या संपर्कात आल्यामुळे अकलूजमध्ये कोरोनाबाधित आढळून येऊ लागले आहेत. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी येत्या गुरूवार दि. २३ ते शनिवार दि. २५ जुलै पर्यंत अकलूज शहर कडकडीत बंद (संचारबंदी) ठेवण्याचा निर्णय ग्रामंस्तरीय समितीच्या वतीने घेण्यात आला आहे.

अकलूज शहर हे मेडिकल हब म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर इथली बाजारपेठही मोठी आहे. येथे दवाखाना, खरेदी व व्यापारासाठी आजुबाजुच्या तालुक्यांतून लोक येत असतात. माढा तालुक्यातून उपचारासाठी आलेल्या रूग्णाच्या संपर्कात आल्यामुळे अकलूज शहरात पहिले दोन कोरोना रूग्ण आढळले. त्यानंतर मुंबई येथून व माण तालुक्यातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कामुळे अकलूज शहरासह आजुबाजूच्या कोंडबावी, माळीनगर परिसरात रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. अकलूज शहराच्या रामायण चौक, व्यंकटनगर परिसरामध्ये कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आल्यानंतर काही दिवस कोरोना साखळी तोडण्यासठी लॉकडाऊन करावे अशी नागरिकांची उत्स्फूर्तपणे मागणी होती.

त्यानुसार आज ग्रामस्तरीय समितीच्या वतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये दि. २३ ते २५ जुलै या तीन दिवसांमध्ये अकलूज शहरात संपुर्ण संचारबंदी जाहीर करण्यात आली. या काळात फक्त औषध दुकाने व दूध व्यवसाय सुरू राहतील. अत्यावश्यक कारणासाठी बाहेर पडण्याकरीता नोडल ऑफिसरची परवानगी घ्यावी लागेल असे ग्रामस्तरीय समितीचे अध्यक्ष सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी जाहीर केले आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!