कोरोना ही एक नवीन उद्योजक बनण्याची संधी : हुडलरचे सीईओ अझर बागवान यांचे मत

गोपाळपूर: कोरोना ही एक नवीन उद्योजक बनण्याची संधी असल्याचे मतं हुडलरचे सीईओ अझर बागवान यांनी व्यक्त केले. ते येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर च्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाकडून ‘कोविड-१९ नंतरच्या उद्योजकतेच्या संधी’ या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये बोलत होते.

स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ट्रेनिंग व प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा.अविनाश मोटे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांसाठी विविध मार्गदर्शनपर उपक्रमांचे आयोजन केले जाते. अशाच उपक्रमांचा एक भाग म्हणून हा वेबिनार आयोजित करण्यात आला होता.

बदललेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन भारतामध्ये उद्योजक निर्माण होण्याची नितांत गरज आहे. ‘नोकरी करून कामगार बनण्यापेक्षा उद्योग उभारून इतरांसाठी नोकऱ्या निर्माण करण्याची गरज आहे’ असे प्रतिपादन अझर बागवान यांनी केले. पुढे त्यांनी उद्योजक बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व तांत्रिक गोष्टींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘सध्याच्या जगात कौशल्य प्राप्त करून स्वतःचा उद्योग स्थापन करून त्याद्वारे इतरांना नोकऱ्या देणे हा येणाऱ्या अभियंत्यांच्या पिढीचा दृष्टिकोन असावा. याकरिता आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी जसे संयम, दूरदृष्टी, सर्वसमावेशकता इत्यादी महत्वाचे गुण आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत. बदललेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन समाजाला लागणाऱ्या बारीकसारीक गोष्टींचा विचार करून स्वतःचा उद्योग निर्माण करावा. यासाठी कोरोना ही नव उद्योजकांसाठी एक संधी आहे. विद्यार्थ्यांचा प्रोजेक्ट हा प्रॉडक्ट बनला पाहिजे’ असे प्रतिपादन त्यांनी केले.

मार्गदर्शन करताना पुढे ते म्हणाले की, ‘बदललेल्या परिस्थितीत नवउद्योजकांना स्वतःचा व्यवसाय सुरु करून जागतिक बाजारपेठेबरोबर व्यापार करण्याची एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. त्याचा पुरेपूर फायदा उद्याच्या अभियंत्यांनी घ्यावा यासाठी आवश्यक कौशल्य प्राप्त करून उद्योग क्षेत्रात पाऊल टाकून सुरुवात करावी.’ त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी नवीन उद्योग उभारण्यासाठी असणाऱ्या अडचणी बाबत प्रश्न विचारले असता अतिशय समर्पक अशा शब्दात विद्यार्थ्यांना त्यांनी उत्तरे दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे, प्रा. दिगंबर काशीद, प्रा. कुलदीप पुकाळे, प्रा. विक्रम चव्हाण व प्रा. श्रीनिवास दर्शने यांनी प्रयत्न केले.

7 thoughts on “कोरोना ही एक नवीन उद्योजक बनण्याची संधी : हुडलरचे सीईओ अझर बागवान यांचे मत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!