क्वारंटाइन सेंटर अथवा डॉक्टरांच्या निवासासाठी आपला पंढरपूरचा बंगला देण्याची आ.भालकेंची तयारी

पंढरपूर– कोरोनाच्या उपाययोजनांसाठी गरज पडल्यास आपला पंढरपूर शहरातील बंगला प्रशासनाने ताब्यात घ्यावा येथे परगावाहून येणार्‍यांना क्वारंटाइन करावे अथवा वैद्यकीय उपचार करणार्‍या डॉक्टरांची निवासाची सोय करावी. मात्र कोणाची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन आमदार भारत भालके यांनी केले आहे.
येथील अधिकार्‍यांसमवेत झालेल्या बैठकीत आमदार भालके यांनी आपला यमाई तलावाजवळील बंगला कोरोनाच्या उपाययोजनांसाठी देण्याची तयारी दर्शविली. यासाठी येथे काही सोयी सुविधा लागणार असतील तो खर्च ही आपण करू अशी तयारी भालके यांनी दर्शविली. या बैठकीस प्रांताधिकारी सचिन ढोले, पोलीस उपअधीक्षक डॉ.सागर कवडे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर शहरात परराज्य व परजिल्ह्यातून येथील मूळ रहिवासी परत येत आहेत. ही संख्या हजारात आहे. या नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येत आहे. यासाठी पंढरपूर शहरातील शाळा, कॉलेज, मठाच्या इमारती ताब्यात घेण्यात आल्या आहेत. शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसात 6 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत, ते मुंबई अथवा पुण्यातून आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेले काही दिवस विविध विषयांवर आमदार भारत भालके हे अधिकार्‍यांच्या बैठका घेत आहेत. यावेळी त्यांनी नागरिकांना क्वारंटाइन करण्यासाठी अथवा वैद्यकीय सेवा बजावणार्‍यांच्या निवासासाठी जर आपला बंगला गरजेचा असेल तर प्रशासनाने याचा विचार करावा असे आवाहन केले आहे. भालके यांच्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे. दरम्यान भालके यांनी कोराना विरोधातील उपाययोजना करण्यासाठी यापूर्वी 50 लाख ₹ आमदार निधी ही दिला आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!