खा. शरद पवार यांच्या भाषणात सतत कल्याणराव काळे यांचा उल्लेख…!

पंढरपूर- राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे सरकोली येथे भालके कुटुंबाच्या सांत्वनपर भेटीसाठी आले असताना त्यांनी तेथे जमलेल्या भालके समर्थकांना संबोधित केले. या दरम्यान त्यांच्या भाषणात सतत तेथे उपस्थित असणारे भाजपाचे नेते तथा सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांचा उल्लेख होत होता. काळे हे विठ्ठल परिवाराचे नेते असून पूर्वीपासून काँग्रेसी विचारधारेतच काम करत होते मात्र गतवर्षी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता.
विठ्ठल परिवारातील पवार समर्थक असणारे व राष्ट्रवादीचे दिग्गज नेते कै. राजूबापू पाटील व कै. आमदार भारत भालके यांचे निधन झाले आहे. या परिवाराने व पक्षाने लागोपाठ दोन धक्के सहन केले आहेत. कल्याणराव काळे हे विठ्ठल परिवाराचे नेते असून त्यांच्यावरही आता या परिवाराच्या मजबुतीची जबाबदारी आहे. या परिवारात सर्वपक्षीय नेते काम करत आहेत. कल्याणराव काळे यांचे पवार यांच्याशी घनिष्ठ संबंध होते मात्र गत लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाची साथ केल्याने ते शरद पवार यांच्यापासून दुरावले होते. मात्र राज्यात अचानक महाविकास आघाडीचे सरकार आले व काँगे्रस,राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलेल्यांची गोची झाले आहे. असे असतानाही यंदा साखर कारखाने सुरू करताना काळे यांच्या सहकार शिरोमणी कारखान्याला शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदत केली आहे. विठ्ठल सहकारीबरोबर हा कारखानाही सुरू झाला पाहिजे अशी भूमिका कै.आमदार भारत भालके यांनी घेतली होती.
आता आमदार भारत भालके व राजूबापू पाटील यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार हे सतत या मतदारसंघावर लक्ष ठेवून आहेत. पंढरपूर व मंगळवेढा या दोन तालुक्यात हा विधानसधा मतदारसंघ विभागला आहे तर पंढरपूर तालुक्याची काही गावेे माढा, सांगोला, मोहोळ या मतदारसंघात जोडली गेली आहेत. कल्याणराव काळे यांनी यापूर्वी माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांना टक्कर दिली होती. विधानपरिषदेला दीपक साळुंखे यांच्याविरोधात अर्ज दाखल केला होता. काळे यांचा कारखाना सांगोल्याला जोडलेल्या भाळवणी भागात आहे तर त्यांच्या गटाचे वर्चस्व माढा विधानसभाक्षेत्राला जोडलेल्या गावात मोठ्या प्रमाणात आहे. काळे यांच्या अनेक संस्था कार्यरत आहेत.
कल्याणराव काळे यांचे वडील स्व. वसंतराव काळे यांनी शिवसेनेत प्रवेश करून चंद्रभागा कारखान्याचा प्रश्‍न 1995 च्या काळात मार्गी लावला होता. नंतर त्यांनी ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कल्याणराव काळे हे देखील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी होते. मात्र मध्यंतरीच्या काळात त्यांना पक्षाकडून संधी मिळत नव्हती ही वस्तुस्थिती होती. म्हणून त्यांनी 2014 ला शिवसेनेत प्रवेश केला मात्र तत्काळ पुन्हा काँगे्रसमध्ये परतले तर 2019 ला त्यांनी लोकसभा व विधानसभेला भाजपाची साथ केली. असे असले तरी ते विठ्ठल परिवारात काम करत राहिले.
आता राजूबापू पाटील व भारत भालके यांच्या निधनानंतर विठ्ठल परिवाराची ताकद अबाधित राखण्यासाठी सर्वांना एकत्रित ठेवणे गरजेचे असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जाणतात, म्हणूनच त्यांनी शुक्रवारी सरकोलीत सर्वांनी एकत्रित काम करावे असे आवाहन करत असताना कल्याणराव काळे यांचा सतत उल्लेख केला. काळे हे भाजपात जरी गेले असले तरी त्यांना पक्षांतराने काय फायदा झाला हे सांगता येणे कठीण आहे. मात्र सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या कारखान्याला मदत केली आहे. शरद पवार यांना सोलापूर जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादीला प्रबळ करायचे आहे. यासाठीच त्यांचे सतत प्रयत्न सुरू असतात.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!