गुरूवारी पंढरपूर शहरात ९ तर ग्रामीणमध्ये ३ कोरोना रुग्ण आढळले

पंढरपूर – सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये गुरूवारी 18 फेब्रुवारी रोजी 38 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून सर्वाधिक 12 ची नोंद पंढरपूर शहर व तालुक्यात आहे. माघ वारीच्या तोंडावर येथे रूग्ण संख्या वाढत आहे.
पंढरपूर शहरात 9 तर ग्रामीण भागात 3 रूग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा ग्रामीणमध्ये 1490 जणांची तपासणी करण्यात आली असून यापैकी 1452 अहवाल निगेटिव्ह आहेत तर 38 जण पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. गुरूवारच्या अहवालानुसार 17 जणांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्हा ग्रामीणमध्ये सर्वाधिक रूग्ण संख्या ही पंढरपूर तालुक्याची असून आजवर येथे 8 हजार 160 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी 243 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. 7 हजार 870 जणांनी या आजारावर मात केली आहे. सध्या केवळ 47 रूग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
ऐन माघ वारीच्या तोंडावर पंढरपूरमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसात राज्यात कोरोना पुन्हा डोके वर काढत असल्याचे चित्र आहे. याबाबत राज्य सरकारने ही आरोग्यविषयक सर्व नियम पाळण्याचे आवाहन जनतेला केले आहे. जर कोरोनाचा आलेख वाढता राहिला तर लॉकडाऊन पुकारण्याचे सारखे निर्णय ही घेतले जावू शकतात याची जाणीव जनतेला करून देण्यात आली आहे.
पंढरपूर तालुका सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त कोरोना प्रभावित म्हणून ओळखला जात आहे. आता येथे माघ वारीची लगबग सुरू असून कोरोनाचा धोका टळला नसल्याने मंदिरे समितीच्या वतीने 22 व 23 फेब्रुवारी रोजी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र सध्या एकादशीपूर्वीच मोठ्या प्रमाणात भाविक पंढरीत दाखल होत असून गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे कोरोनाविषयक आरोग्य नियम पाळले जात नसल्याचे दिसत आहे. अनेकजण विना मास्क फिरताना दिसत आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!