घरी राहा, सुरक्षित राहा ..हरवलेलं कुटुंब सुख अनुभवा : मुख्यमंत्र्यांचे आवाहन

*जीवनावश्यक वस्तू उपलब्ध, अत्यावश्यक सेवा, दुकाने राहणार सुरु*

*एसीचा वापर टाळण्याचे केले आवाहन*

*कोरोना विरोधातील युद्ध जिंकणारच, व्यक्त केला विश्वास*

मुंबई दि. 25: तुम्ही घराबाहेर पडाल तर कोराना नावाचा शत्रू घरात येईल त्यामुळे सर्वांनी घरातच राहावे, सुरक्षित राहावे असे आवाहन करतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, कोराना नावाच्या संकटावर मात करून आपल्या सर्वांना विजयाची गुढी उभारायची आहे. स्वत:ला सुरक्षित ठेवतांना घरातील ज्येष्ठांना आणि आपल्या मुलाबाळांना, नातवांना जपायचे आहे. आजच्या वर्तमानावर भुतकाळ आणि भविष्यकाळाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी आणि गांभीर्य ओळखून सर्वांनी वागायचे आणि कृतीशील सहकार्य द्यायचे आहे.

*हरवलेलं कुटुंब सुख अनुभवण्याची संधी*

मी आज काही नकारात्मक गोष्टी सांगायला आलो नसल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यातून अनेक सकारात्मक गोष्टीही पुढे येत आहे. आपल्याला आपल्या कुटुंबियांसमवेत वेळ घालण्याची संधी मिळत आहे. कुणी कॅरम खेळत आहे, कुणी बुद्धीबळ खेळत आहे, कुणी पुस्तक वाचत आहे तर कुणी कुटुंबियांशी संवाद साधत आहे. कुणी संगीत ऐकत आहे तर कुणी संगीत वाद्य वाजवत आहेत. आज पूर्ण कुटुंब यानिमित्ताने एकत्र आलं आहे, एक वेगळं, गमावून बसलेलं कुटुंब सुख आपण सर्वजण अनुभवत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
मी मिसेस मुख्यमंत्र्यांचे ऐकतोय, घरी राहून तुम्ही तुमच्या होम मिनिस्टरचे ऐका असे म्हणून त्यांनी वातावरणातील ताण कमी करण्याचा प्रयत्न केला_

*एसी बंद ठेवा*

विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी एसी बंद ठेवा असे आवाहन करतांना यानिमित्ताने मोकळ्या हवेत, वातावरणात राहण्याची संधी मिळणार असल्याचेही ते म्हणाले.

*जीवनावश्यक वस्तु, सेवा, दुकाने, उत्पादनांची वाहतूक सुरु*

काल नागरिकांमध्ये थोडी अस्वस्थता होती, त्यांची धावपळ झाली असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, लॉकडाऊन आपल्याकडे आधी पासूनच सुरु आहे. पण एक गोष्ट प्रामुख्याने सांगतो की, आपल्याकडे पुरेसा अन्नधान्य साठा आहे. आपण जीवनावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तुंची उपलब्धता, ती दुकाने, दवाखाने, पशुखाद्य, माणसांचे दवाखाने, दूध, भाजीपाला, फळे, कृषी मालाची वाहतूक औषधांची दुकाने बंद केलेली नाहीत. या जीवनावश्यक सेवा पुर्वीप्रमाणेच सुरु राहणार आहेत, त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये, गर्दी करू नये.

*वेतन रोखू नये ..कंपन्यांना आवाहन*

हा शिवरायांचा लढवय्या महाराष्ट्र असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आता सर्वांना कोरोना विषाणुचे गांभीर्य कळाले आहे. हे जागतिक युद्ध आहे. हा छुपा शत्रू आहे, नकळत हल्ला करतो. याचे आव्हानही खुप मोठे आहे, ते गांभीर्यानेच घ्यायला हवे. जी रोजंदारीवर काम करणारी कष्टकरी माणसं आहेत, ज्यांचे हातावर पोट आहे अशा कर्मचारी-कामगारांचे वेतन कंपन्यांनी, कारखान्यांनी बंद करू नये, ते सुरु ठेऊन मानव धर्म पाळावा असेही ते म्हणाले.

*हे युद्ध आपण जिंकणारच*

मदतीसाठी पुढे येणाऱ्या अनेक हातांचे त्यांनी कौतूक केले. रिलायन्स इंडस्ट्रीने एक हॉस्पीटल तयार करून दिल्याचे ही त्यांनी सांगितले. कुणी मास्क उपलब्ध करून देत आहे तर कुणी आणखी काही. या सगळ्यांच्या आणि तुम्हा सर्वांच्या सहकार्यातून आपल्याला हे युद्ध जिंकायचेच आहे, नव्हे आपण ते जिंकणारच असा विश्वासही त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!