जिल्हा कारागृहातील कोरोनाची साखळी तोडण्यात यश , कैदी आणि कर्मचारी झाले कोरोनामुक्त

सोलापूर, दि.13- सोलापूर जिल्हा कारागृहातील कोरोनाची साखळी तोडण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. योग्य खबरदारी घेत केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे सर्व बंदी व कर्मचारी कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

सोलापूर जिल्हा कारागृह प्रशासनाने कोरोना साथीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी उपायोजना करून देखील न्यायाधीन बंदी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यामध्ये 60 पुरुष न्यायाधीन बंदी व दोन महिला न्यायाधीन बंदी हे पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्याचबरोबर कार्यालयाच्या आस्थापनेवरील 13 पुरुष कर्मचारीदेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. हे सर्व ७५ जण आता कोरोना मुक्त झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या सर्व बंद्यांचे शासकीय तंत्रनिकेतन येथील मुलांच्या वसतिगृहात अलगीकरण करण्यात आले. त्यानंतर या वसतिगृहास सोलापूर महानगरपालिकेकडून कोविड केअर सेंटर म्हणून घोषित करण्यात आले. महानागरपालिकेकडून सर्व बंद्यावर उपचार सुरू करण्यात आले. योग्य वेळेत उपचार मिळाल्याने आता सर्व बंदी व कर्मचारी कोरोना मुक्त झाले आहेत. येथील कोविड सेंटरसाठी पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर कारागृहाकडील कर्मचारीदेखील येथे होते, असे प्रभारी कारागृह अधीक्षक डी. एस. इगवे यांनी सांगितले.

बंदीवर योग्य उपचार व्हावे, तसेच त्यांच्या अडचणी व समस्या दूर करण्याकरिता जिल्हा कारागृहाचे प्रभारी अधीक्षक डी. एस. इगवे आणि वरिष्ठ तुरुंगाधिकारी एस. एन. कदम सेंटरला भेट देऊन पाहणी करत होते.. जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या योग्य खबरदारीमुळे कोरोनाची साखळी तोडण्यास यश आले आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!