ज्ञानेश्वरीतील शब्दांचे सौंदर्यसामर्थ्य शृंगाररसालाही जिंकणारे : हभप सुरेश महाराज सुळ

श्री क्षेत्र आळंदी दि . २२ – माउलींनी श्री ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मराठी वांड्गमयाला सुरेख साज शृंगार चढवून अलंकारयुक्त केले आहे . ज्ञानेश्वरीतील शब्दांचे सौंदर्यसामर्थ्य हे शृंगाररसालाही जिंकणारे आहे असे प्रतिपादन ह. भ. प. सुरेश महाराज सुळ यांनी केले .

आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , श्री क्षेत्र आळंदी , महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ व माय एफ एम इंडिया रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ” पालखी सोहळा पत्रकार संघ ” या फेसबुक पेजवर दररोज सायंकाळी ४ वाजता ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ निरुपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . आज ( सोमवार ) दहाव्या दिवशी अकलूज जि सोलापूर येथील सुरेश महाराज सुळ यांनी विभूतीयोग या दहाव्या अध्यायावर निरुपण केले .

देशियेचेनि नागरपणे l
शांतु शृंगाराते जिणे l
तरि ओंविया होती लेणे l
साहित्यासी ll

सुळ महाराज म्हणाले , महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाची योग्यता विश्वधर्म होण्याची आहे ! हा संप्रदाय संतांनी सांगितलेल्या आचार-विचार ,साधना यापलीकडे कोणत्याच मर्यादांनी संकुचित नाही. तुकाराम महाराज म्हणतात,

“घेई आपोषन ब्रह्मांडाचे! “
व माऊली म्हणतात
आनंदाचे आवारू | मांडू जगा ||

आणि या साधना प्रणालीचं विश्वाला घडत असलेले प्रत्यक्ष दर्शन म्हणजे दरवर्षी होणारी आषाढी वारी ! परंतु यावर्षी न दिसणाऱ्या एका विषाणूच्या प्रादुर्भावाने व शासनाची विनंती मान्य करून वारकरी संप्रदायातील वारीची साधना मोठ्या, विशाल पण तितक्याच व्याकूळ अंत:करणाने वारकऱ्यांनी थांबवली . भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन देवाच्या भेटीला जाणारा वारकरी देशावर संकट आल्यानंतर मोठ्या उदार मनाने खांद्यावरील पताका काही वेळेकरीता बाजूला ठेवतो व त्याच खांद्यावर देशाचा तिरंगा फडकवीतो! हा वारकरी संप्रदायाचा समंजसपणा आहे . समन्वय , सामंजस्य या वारकऱ्यांच्या भावना शासनाने योग्य पद्धतीने समजून घेतल्या . यंदा वारकऱ्यांची वारी नसली तरी संतांची वारी होणार आहे . जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या वचनावर अढळश्रध्दा ठेवून वारकऱ्यांनी

ठायीच बैसोनि करा एक चित्त l
आवडी अनंत आळवावा ll
हे वचन पाळले आहे .

देशाच्या अध्यात्मिक , सांस्कृतिक वैभवात वारकरी संप्रदायाचा मोठा वाटा आहे . वारकऱ्यांच्या या योगदानाचा विचार शासनाने करावा हीच प्रामाणिक अपेक्षा आहे .
या आषाढी वारीच्या निमित्ताने श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे चिंतन रोज आपण श्रवण करत आहोत . विश्वाची ज्ञानाची भूक भागविण्याची ताकद ज्ञानेश्वरीत आहे . शास्त्राचा अनुवाद सांगतो तो शास्त्री आणि अनुभव सांगतो तो संत असे सांगून ते म्हणाले , माउलींनी दहाव्या अध्यायात भगवान परमात्मा यांनी सांगितलेल्या विभूतींचा विचार मांडतात. ‘विभुती’ शब्दाचा अर्थ होतो ओज ,तेज ,प्रभा! ज्यामध्ये परमात्म्याचे विशेष स्वरूपात वास्तव्य आहे त्याला विभूती असे म्हणतात . विभूतिचे ७५ प्रकार आहेत . या अध्यायाच्या प्रारंभाला ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरु देवांना संस्कृतप्रचुर शब्दांद्वारे नमन करतात हा अध्याय म्हणजे भोग योगातून ईशयोगाकडे जाण्याची पथदर्शीकाच नव्हे तर या सृष्टीकडे मांगल्याने पाहण्याची व निसर्गाशी संवेदनात्मक नातं जोडण्याची प्रेरणा देणारा हा अध्याय आहे. सृष्टीच्या वैभवाचे वर्णन म्हणजे विभुतीयोग होय! ज्ञानी महात्म्यांचा या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या अध्यायात लक्षात येतो .अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर या अध्यायात स्पष्टपणे प्रभुवर्णन व गुप्त रूपाने भक्त वर्णन आहे असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. माउलींनी संस्कृत भाषेतील गीतेवर टीका करुन प्राकृत मराठी भाषेत भगवत गितेचे सार मांडले आहे . हा ग्रंथ मराठी वांग्मयाला मिळालेला अलंकार आहे . विभूतीयोगाद्वारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात या चराचरामध्ये मीच भरलेलो आहे . तुला माझे दर्शन घ्यायचे असेल तर माझ्या विभूतीमध्ये तुला माझे रुप पहावे लागेल . या कार्यक्रमाचे निवेदन ह भ प स्वामीराज भिसे यांनी केले .

उद्या मंगळवार दि . २३ रोजी केज ( जि बीड ) येथील ह भ प समाधान महाराज शर्मा हे सायंकाळी ४ वाजता ” पालखी सोहळा पत्रकार संघ ” या फेसबुक पेजवर श्री ज्ञानेश्वरीच्या विश्वरूपदर्शनयोग या अकराव्या अध्यायावर निरुपण करतील .

दरम्यान आज ( सोमवार ) पहाटे श्री क्षेत्र आळंदी येथे आजोळघरी श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पादुकांची विधीवत पूजा , अभिषेक व आरती पालखी सोहळा प्रमुख योगेश महाराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आली . यज्ञेश्वर जोशी व राहूल जोशी यांनी पूजेचे पौरोहित्य केले . रात्री वासकर फडाच्या वतीने कीर्तनाची सेवा तर रात्री केदारबाबा कराडकर यांच्या वतीने जागराची सेवा करण्यात आली .

9 thoughts on “ज्ञानेश्वरीतील शब्दांचे सौंदर्यसामर्थ्य शृंगाररसालाही जिंकणारे : हभप सुरेश महाराज सुळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!