ज्ञानेश्वरी म्हणजे प्रत्येक जीवाला स्वस्वरुपी पोहोचविणारा ग्रंथ

श्री क्षेत्र आळंदी दि . १६ – ज्ञानेश्वरी म्हणजे संसारातील प्रत्येक जीवाला, अबालसुबोध बालकांना त्याच्या स्वस्वरूपा पर्यंत पोहचविणारा ग्रंथ होय . एवढेच नाही तर सर्व ग्रंथाींचा भेद करणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी होय असे मत ह. भ. प. भानुदास महाराज टेंबुकर यांनी व्यक्त केले .
आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , श्री क्षेत्र आळंदी , महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ व माय एफएम इंडिया रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ” पालखी सोहळा पत्रकार संघ ” या फेसबुक पेजवर ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ निरुपण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . आज निरुपणाच्या चौथ्या दिवशी ज्ञानसंन्यासयोग या चौथ्या अध्यायावर टेंबुकर महाराज यांनी निरुपण केले .

टेंबुकर म्हणाले , गेले तीन दिवस झाले ही निरुपण सेवा सुरु आहे . त्यापैकी चौथ्या दिवसाची सेवा व चौथ्या अध्यायाचे निरुपण माझ्याकडे आले आहे. चौथ्या अध्यायाचा विचार केला तर आपल्या असे लक्षात येते की प्रथम माउलींनी श्रवण इंद्रियांच्या भाग्याचे वर्णन केले आहे . या अध्यायात भगवंताचे अर्जुना वरती किती प्रेम आहे हे दिसून येते . किती प्रेम आहे असे म्हणाल तर जी गोष्ट देवाने आपल्या आईला , वडिलांना व बंधू बलरामला कधी सांगितली नाही तसेच सर्वात जवळ सणारी आपली पत्नी लक्ष्मीमातेला सुद्धा जी गोष्ट कधी सांगितली नाही ती गोष्ट देवाने अर्जुनाला सांगितली . अर्जुनासाठी निर्गुण असलेला भगवान श्रीकृष्ण सगुण झाला येवढे प्रेम भगवान श्री कृष्णाचे भक्तराज अर्जुनावरती आहे. या अध्यायाचे निरुपण करताना निष्काम कर्माची परंपरा त्यांनी सांगितली .
माउली म्हणतात , भगवंताचे आवताराला येण्याचे प्रयोजन काय ? हे अवतार प्रयोजन जो जाणतो तो सुटतो व हे जो जाणत नाही तो पुन्हा संसारात येतो . भगवान श्रीकृष्णाचे व अर्जुनाचे विपुल जन्म होवून गेले . जेंव्हा जेंव्हा वेदविहीत धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्म वाढतो तेंव्हा तेंव्हा मला अवतार धारण करावा लागतो असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात .

यज्ञाविषयी बोलताना टेंभूकर महाराज म्हणाले , यज्ञाचे १४ प्रकार आहेत . त्यापैकी द्रव्ययज्ञ , तपोयज्ञ , योगयज्ञ , वाग्यज्ञे आणि ज्ञानयज्ञ असे पाच प्रकारचे यज्ञ आहेत . या सर्व यज्ञात ज्ञानयज्ञ मोठा आहे . श्रोतस्मार्त कर्मे ज्ञानातच समाप्त होतात .ते ज्ञान सदगुरू जवळ जाऊन त्यांना अंतकरणाने दंडवत घालून जिवेभावे नमस्कार करुन त्यांची सेवा केली तर आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होते .

तरी आत्मसुखाचिया गोडिया l
विटे जो का सकळ विषया l
जयांचा ठायीं इंद्रिया lमानु नाही ll

आत्मसुखाच्या आवडीने जो सर्व विषयांना विटतो . त्याच्या जवळ इंद्रियांना महत्व नाही . ज्याला मनाची भिड पडत नाही , प्रकृतीने केलेले कर्म आत्म्याकडे घेत नाही . जो श्रध्देच्या संभोगाने सुखी झाला . त्या अधिकारी पुरुषाच्या शोधात ज्ञान असते .
सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक जीवाला कर्म तर करावेच लागते . माउली म्हणतात ,

जव संग होय प्रकृतीचा l
तव त्यागु न घडे कर्माचा l

मग कर्मानेच कर्माच्या बंधनातुन कसे सुटावे तर कर्तुत्वाचा मद व कर्म फलाचा आस्वाद सोडुन कर्म करावे म्हणजेच ते कर्म ब्रम्हार्पण बुद्धीने करावे म्हणजे या बंधनातुन जीव सुटू शकतो . ज्ञान प्राप्त करुन संशयास नष्ट करावे व परमपदास नाम मोक्षास प्राप्त व्हावे . अर्जुना , तुझ्या हृदयात असलेला संशय तु दूर कर . तु बलवान आहेस . मोहमायेत पडू नकोस युध्दास सज्ज हो .या कार्यक्रमाचे निवेदन ह. भ. प. स्वामीराज महाराज भिसे यांनी केले .

उद्या बुधवार दि . १७ रोजी सायंकाळी ४ वाजता श्री क्षेत्र पैठण येथील ह भ प योगेश महाराज गोसावी हे योगगर्भयोग या पाचव्या अध्यायावर निरुपण करणार आहेत .

दरम्यान आज श्री क्षेत्र आळंदी येथे आजोळघरी माउलींच्या पादुकांची पुजा , अभिषेक व आरती विश्वस्थ डॉ अभय टिळक यांच्या हस्ते करण्यात आली . पुजेचे पौरोहित्य यज्ञेश जोशी व राहुल जोशी यांनी केले . रात्री भोगलगावकरांच्या वतीने कीर्तनाची सेवा तर मोझे यांच्या वतीने जागर करण्यात आला .

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!